मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
उत्तर महाराष्ट्राचा विकासदूत ठरलेल्या दैनिक ‘देशदूत’ परिवारातर्फे मालेगाव शहर-तालुक्यात विविध क्षेत्रांत आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर ठसा उमटवणार्या मान्यवरांना ‘मालेगाव भूषण’ हा मानाचा पुरस्कार देत सन्मानित केले जाणार आहे. ख्यातनाम हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते मिलिंद गुणाजी व जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
शहरातील मराठा दरबार सभागृहात आज शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता दैनिक ‘देशदूत’तर्फे ‘मालेगाव भूषण पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा दै.‘देशदूत’ परिवाराने जपली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर पादाक्रांत करणार्यांचा सन्मान व्हावा, हा हेतू परंपरा जपण्यामागे राहिला आहे.
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सुपरिचित असलेल्या मालेगाव शहर-तालुक्याला वैद्यकीय, व्यापार, उद्योग, सहकार, शैक्षणिक, शेती, सामाजिक व राजकीय क्षेत्राला उंचीवर नेण्याचे काम शहर-तालुक्यातील मान्यवरांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर केले आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासह सामाजिक बांधिलकीतून मालेगावच्या या प्रगतीपर्वात अभूतपूर्व योगदान देणार्या मान्यवरांचा यथोचित गौरव व्हावा. तसेच या मान्यवरांच्या कार्यातून मालेगावच्या प्रगतीसाठी इतरांनाही प्रेरणा मिळावी, या दृष्टिकोनातून दैनिक ‘देशदूत’ परिवारातर्फे विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश व कामगिरी बजावणार्या मान्यवरांचा ‘मालेगाव भूषण’ पुरस्कार देत यथोचित सन्मान केला जाणार आहे.




