नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेण्यासाठी एटीएस अधिकाऱ्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. मालेगावात २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ले. कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची सुटका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवतांचे नाव घेण्यासाठी दबाव
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि इतरांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असे मत प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तुरूंगात घालवलेल्या दिवसांबद्दल बोलताना आपला छळ करण्यात आल्याचे ठाकूर म्हणाल्या आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, एटीएस अधिकाऱ्यांनी मला १३ दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात वेगवेगळ्या लोकांची नावे घेण्यासाठी छळ करण्यात आला. यावेळी त्यांनी ही नावे कोणती होती याबद्दल देखील माहिती दिली आहे.
मला रुग्णालयात बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले
प्रज्ञा ठाकूर यांनी आज (२ ऑगस्ट) रोजी दिलेल्या माहितीनुसार, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्यासह अनेक लोकांची नावे सांगण्यास सांगितले. त्यांनी हे सर्व करण्यासाठी मला छळले. माझे फुफ्फुस निकामी झाले, मला रुग्णालयात बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले. मी गुजरातमध्ये राहत होते म्हणून त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास सांगितले. मी कोणाचेही नाव घेतले नाही कारण ते मला खोटे बोलण्यास भाग पाडत होते असे ठाकूर म्हणाल्या.
मी दररोज मरत होते, मात्र आज आनंद झाला
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वींनी माध्यमांशी संवाद साधताना आपण १७ वर्षे अपमान सहन केल्याचे म्हणत स्वतःच्या देशात आम्हाला दहशतवादी बनवण्यात आल्याची खेदजनक प्रतिक्रिया दिली. ‘मला १३ दिवस टॉर्चर करण्यात आले. माझे आयुष्य उध्वस्त झाले. मी संन्यासी आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, पण मी दररोज मरत होते. आज मात्र मला आनंद झाला आहे, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे. हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला आहे’, असे म्हणत त्यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.
देशातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या दहशतवादी खटल्यांपैकी एक असलेल्या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत, खून आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल सात जणांवर खटला चालवण्यात आला. 29 सप्टेंबर 2008 रोजी, मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलवर लावलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि ९२ जण जखमी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




