मालेगाव प्रतिनिधी
विकृत मानसिकतेचा बळी ठरलेल्या डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आज मालेगावमध्ये बंद पाळण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी शेखर ऊर्फ विजय खैरनार गुरवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात मालेगाव न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले असता संतप्त महिला व तरूणांनी त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत पोलीस वाहनांना घेराव घातला. यामुळे न्यायालय आवारात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक महिलांसह ग्रामस्थांनी खैरनारला ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ, असा आग्राह धरत आवारातच ठिय्या मांडल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. संतप्त जमावाची समजूत पोलीस अधिकाऱ्यांनी काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होत नसल्याने अखेर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयीन कामकाज पार पाडावे लागले. यावेळी आरोपी खैरनार यास युक्तिवादानंतर सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व आरोपीस फाशीची शिक्षा जलदगती न्यायालयात खटला चालवत देण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २१) मालेगाव बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये व्यापारी प्रतिष्ठानांसह शाळा, महाविद्यालयेदेखील सहभागी झाले आहे. रामसेतू पुलावरून निषेध मोर्चा काढण्यात येऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सर्व स्तरातून समर्थन मिळत असल्याने हा बंद कडकडीत पाळण्यात आला आहे. मालेगावकरांकडून या बंदला उत्सुर्त पाठिंबा देण्यात आला असून या बंदला मुस्लिम बहुल भागातूनही अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. हा बंद कुठल्याही संघटना किंवा पक्षा तर्फे पुकारण्यात आला नसून मालेगावकरांकडून पुकारण्यात आल्यामुळे या मोर्चासह बंदला मालेगावकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

दरम्यान, या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे, भाजपच्या आमदार चित्रा वाघ, यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भेट देणार आहे.

शेतमालाचा लिलाव बंद
डोंगराळेतील बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी मालेगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी होत असल्याने शुक्रवारी सर्व शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी शुक्रवारी समितीत आणू नये, असे आवाहन सभापती चंद्रकांत शेवाळे, सचिव कमलेश पाटील यांनी केले आहे.
विविध संघटनांतर्फे कॅण्डल मार्च
अत्याचारानंतर बालिकेच्या करण्यात आलेल्या निघृण हत्येचे पडसाद शहरात उमटतच आहेत. येथील सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे शहरातील शिवतीर्थ भागात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी महिलांनी हातात मेणबत्ती प्रज्वलित करून संबेदना प्रगट केल्या. डोंगराळे गावातही स्किल किंगडम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे रात्री कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील महिला, तरुण-तरुणी व विद्यार्थिनी हातात पेटत्या मेणबत्या घेऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी करत गावातून रॅली काढली.
येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फेही मोसम पूल भागात महात्मा गांधी पुतळ्याजवळ हजारो महिलांनी कॅण्डल मार्चद्वारे या हत्येचा निषेध करत प्रज्ञाला न्याय देण्याची मागणी केली. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्यासह समितीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. डोंगराळे येथील न्यू इंग्लिश स्कूलतर्फे ही रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येऊन विद्यार्थिनीसह शिक्षकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
या घटनेप्रकरणी कॅम्प भागातील वंदे मातरम् संघटनेतर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विकृत मानसिकतेच्या खैरनार याला फाशी देण्यात यावी. तसेच मालेगाव हे शहर अतिसंवेदनशील असल्याने या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करावी, अतिरिक्त पोलीस बळ द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे जगदीश गोन्हे, राजीव अक्कर, रवींद्र कुलकर्णी, आनंद मोरे, बिशाल गायकवाड, सौरभ अहिरे, महेश गायकवाड, सुरेश खैरनार, संदीप भडांगे आदीसह कॅम्प परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. शहरातील शहर व तालुका ओबीसी संघटनेने तसेच समता परिषदेनेही या घटनेसंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करत अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन दिले. यज्ञाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश उचित, समता परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, वाय. के. खैरनार, रामभाऊ बोरसे, भारती बिरारी, सीमा चव्हाण, तृप्मी सोनवणे, दगा चौधरी, प्रभाकर व्यवहारे, अॅड. नीलेश रोकडे, कैलास तिसगे, मयूर बांद्रे, संजय पवार, पिंटूबोरसे यांनी केली आहे.
तरुणांचा रास्ता रोको, वकील संघाचा बहिष्कार
बालिकेची हत्या करणाऱ्या संशयित विजय खैरनार यावे वकीलपत्र घेण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर निकम यांच्या नेतृत्वाखाली सर्व वकिलांनी घेतला. त्यामुळे एकही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र स्वीकारले नाही. आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आमच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संतप्त तरुणांसह महिलांनी कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपअधीक्षक दर्शन दुगड यांनी तरुणांची समजूत काढल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.




