मालेगाव | प्रतिनिधी
येथील समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) नेत्या उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद हिंद (Deputy Mayor Shanehind Nihal Ahmed Hind) यांनी महानगरपालिकेतील (Malegaon Municipal Corporation) आपल्या दालनात महापुरुषांबरोबरच टिपू सुलतान (Tipu Sultan) यांची प्रतिमा पुन्हा लावली आहे. यामुळे शहरात पुन्हा वादंग उठण्याची चिन्हे दिसत आहेत.
उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शानेहिंद यांनी महानगरपालिकेतील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी भेट दिलेली टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती. या प्रतिमेवरून हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध करीत आयुक्तांच्या दालनात हनुमान चालीसा पठण करीत आंदोलन केले होते.
प्रतिमा काढण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे मागणी करण्यात आली होती. या प्रतिमेवरून तीव्र पडसाद उमटल्याने सदर प्रतिमा कार्यालयातून काढण्यात आली होती. दरम्यान, उपमहापौर कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारी या कार्यालयाचे उद्घाटन महापौर नसरीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमहापौर कार्यालयात महापुरुषांसोबत टिपू सुलतान यांची प्रतिमा लावल्याचे निदर्शनास आले.
‘मी समर्थन करत नाही…’, मोहन भागवतांच्या कार्यक्रमावर न्युयॉर्कचे महापौर ममदानींची पहिली प्रतिक्रिया
या संदर्भात पत्रकारांनी पृच्छा केली असता उपमहापौर शानेहिंद यांनी यापूर्वी टिपू सुलतान यांचा फोटो काढला नव्हता. कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे तो काढून ठेवावा लागला होता असा खुलासा करत आता कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने टिपू सुलतान यांची प्रतिमा महापुरुषांसोबत लावली असल्याचे स्पष्ट केले. भारत संविधानावर चालणारा देश आहे. या संविधानातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी टिपू सुलतान यांनी बलिदान दिल्याची नोंद आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण होण्यासाठी ही प्रतिमा आपण लावली असल्याचे उपमहापौर शानेहिंद यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.




