मालेगाव | प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने सोमवारी रात्री महायुती होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मालेगावी भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या वृत्ताला महानगरप्रमुख देवा पाटील यांनी दुजोरा दिला.
गत काही दिवसांपासून मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी हिंदूबहुल भागातील पाच प्रभागातील २० जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजप यांच्यात बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, भाजपकडून आठ जागा मागण्यात येत होत्या तर शिवसेनेकडून १४-६ हा जागा वाटपाचा फार्म्युला देण्यात येत होता. यात मालेगावी महायुतीत शिवसेना स्वतःला मोठा भाऊ समजत होता. तर भाजपकडून आम्ही राज्यात मोठा भाऊ असल्याचे सांगत जादा जागा मागण्याचा आग्रह धरला जात होता.महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत हा जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने महायुतीतील वरिष्ठ नेते मंत्री दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे जागा वाटप तिढ्याचा चेंडू टाकण्यात आला होता.
दरम्यान, नांदगाव आणि मनमाड प्रमाणेच मालेगावमध्ये शिवसेनेकडून उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूकाका बच्छाव, डॉ. अद्वय हिरे, माजी जिल्हाप्रमुख सुनील गायकवाड यांनी मालेगाव निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका काल व्यक्त केली होती. त्यामुळे मालेगावात भाजपला कमी जागा मिळत असल्याचे कारण सांगून महायुती संपुष्टात आल्याचे देवा पाटील यांनी नमूद केले.





