पारनेर/ अहिल्यानगर |प्रतिनिधी| Parner
निघोज (ता. पारनेर) येथील मळगंगा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकार्यांनी संगनमत करून ठेवीदारांची एक कोटी 10 लाख आठ हजार 323 रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात 22 जणांविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 अन्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब लिंबाजी थोरात (वय 62, रा. शंकरनगर, खराडी, पुणे, मूळ रा. पिंपरीजलसेन, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर नारायण कवाद, उपाध्यक्ष रामदास बाबुराव लंके, तसेच संचालक बाळासाहेब गणाजी लामखडे, मच्छिंद्र जिजाबा लंके, नामदेव हरिभाऊ पठारे, रायचंद खंडु गुंड, भाऊसाहेब विठोबा लागखडे, संतोष बन्सी येवले, भास्कर तुकाराम शेळके, राजेंद्र भागा लाळगे, प्रकाश शिवराम कवाद, वसंत जानकु बुचडे, मुकुंद रामचंद्र निघोजकर, शंकर रामचंद्र वराळ, संजय बबन सोनवणे, पुष्पा प्रकाश पांढरकर, विजया लहु वागदरे, अविनाश पंढरीनाथ मांढरे, रामदास बाबु रोहीले, तसेच मॅनेजर दिलीप पोपटराव वराळ, शाखाधिकारी संपत गणाजी लामखडे आणि विशेष वसुली अधिकारी संतोष बाबुराव साबळे यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी अधिक व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. मात्र मुदत संपल्यानंतर देखील ठेवी परत न करता फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबाची एक कोटी 10 लाख आठ हजार 323 रूपये इतक्या रकमेची फसवणूक केली. 1 नोव्हेंबर 2024 पासून 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पतसंस्थेत ठेवीदारांकडून विविध योजनांव्दारे रक्कम स्वीकारण्यात आली होती. मात्र मुदत पूर्ण होऊन देखील ठेवीदारांना पैसे परत न दिल्याने त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणामुळे निघोज परिसरात ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे अधिक तपास करीत आहेत.




