अहिल्यानगर (प्रतिनिधी)
घर घेऊन देतो, असे आमिष दाखवून तब्बल सहा लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजेश्वर मनोहर भोसले (वय 44, रा. बालिकाश्रम रस्ता, सुडके मळा, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (22 मे) फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संकेत राजेंद्र भोसले (रा. पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) हा फिर्यादी राजेश्वर भोसले यांचा भाचे जावई आहे. त्याने मी तुम्हाला 22 लाख रूपयांत घर घेऊन देतो असे सांगून राजेश्वर यांचा विश्वास संपादन केला. 29 डिसेंबर 2023 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेळोवेळी फोन पेव्दारे चार लाख 47 हजार रूपये आणि रोख दोन लाख तीन हजार रूपये, असे एकूण सहा लाख 50 हजार रूपये घेतले.
पैसे दिल्यानंतर देखील संकेतने कोणतेही घर दाखवले नाही. अनेक वेळा पैशांची मागणी केल्यानंतर त्याने 28 मे 2024 रोजी सहा लाख 50 हजार रूपयांचा एचडीएफसी बँकेचा चेक आणि रोख 20 हजार रूपये दिले. त्यानंतर पुन्हा एकदा सहा लाख 30 हजार रूपयांचा जिल्हा सहकारी बँकेचा चेक दिला, मात्र दोन्ही चेक बाउन्स झाले. त्यामुळे पैसे परत मिळाले नाहीत. राजेश्वर यांना समजले की, संकेत याने बोगस कोरे चेक देऊन फसवणूक केली असून पैसे देण्याचे टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता आणि आता कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोरडे करीत आहेत.