अहिल्यानगर । प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक आणि खारेकर्जुने गावांच्या परिसरात लहान मुलांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी केलेल्या तीव्र आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
निंबळक आणि आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण पसरले होते. निंबळक, हिंगणगाव, हमीदपूर, इसळक आणि खारेकर्जुने यांसारख्या गावांमध्ये बिबट्याने लहान मुलांवर आणि पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले केले होते. या बिबट्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. या वाढत्या दहशतीमुळे काल निंबळक गावामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात उपवनसंरक्षक, वन विभाग अहिल्यानगर आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून त्याला गोळी घालून ठार मारण्याची मागणी अत्यंत संतप्त प्रतिक्रियांसह व्यक्त केली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगर तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. बिबट्याने माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना जखमी केले, तसेच काही ठिकाणी त्यांचा जीवही घेतला. खारेकर्जुने येथे एका मुलीला बिबट्याने उचलून नेऊन तिचा जीव घेतला होता, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. या दुर्दैवी घटनेनंतर लगेचच निंबळक येथे एका मुलाला बिबट्याने जखमी केले. बिबट्याचे हल्ले केवळ माणसांवरच नव्हे, तर पाळीव प्राण्यांवरही सुरू होते. शनिवारी सकाळीही बिबट्याने कोंबड्या, शेळ्या आणि बकऱ्या फस्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे निंबळक, खारेकर्जुने, हिंगणगाव, हमीदपूर आणि इसळक या गावांमध्ये प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, त्याला गोळ्या घालून ठार मारावे किंवा पिंजरे लावून पकडावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शनिवारी (दि. १५) सकाळी अकरा वाजता निंबळक गावात आणि निंबळक बायपास चौकात रास्ता रोको आंदोलनही केले होते. नागरिकांचा वाढता रोष आणि बिबट्याच्या हल्ल्यांची तीव्रता पाहता, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली. अखेरीस, मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानुसार या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे निंबळक परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. आता वन विभागाकडून बिबट्याला शोधून, त्याला ठार मारण्याची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल. या कारवाईनंतरच परिसरातील दहशत पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे.




