मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तावेज व फसवणुकीप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात ठोठावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी कायम ठेवली होती. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कडून क्रीडा खाते काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांकडे देण्यात आले आहे.व त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे कडे असलेली खाते काढून घेण्यात आली आहेत. दरम्यान,मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या कडील क्रीडा खाते कुणाला देणार याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. या नंतर माणिकराव कोकाटे यांची भूमिका काय आणि हे मंत्री पद कुणाला भेटणार या कडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
कॉलेज रोडच्या येवलेकर मळा परिसरातील दूध संघानजिकच्या इमारतीमध्ये शासनाच्या १० टक्के योजनेतील सदनिका मिळविण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कमी उत्पन्नासंदर्भातील कागदपत्रे सादर केले आणि सदनिका मिळविली होती. यासंदर्भात तत्कालीन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर आरोप केले होते.
याप्रकरणी १२ डिसेंबर १९९५ रोजी सरकारवाडा पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीनुसार कोकाटे बंधुंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून सरकारवाडा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायधीश रुपाली नरवाडिया यांनी या खटल्यासंदर्भात २० फेब्रुवारी २०२५ रोजी मंत्री कोकाटे व विजय कोकाटे यांच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला होता.




