आंतरवाली सराटी | Antarwali Sarati
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी धनंजय मुंडेचा निकटवर्तीय कांचन याच्या संपर्कात होते, असा आरोप जरांगे यांनी केला. त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिली, असा खळबळजनक आरोप केला.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांनी बीडमधील कांचन, आंतरवालीमधील बडे या दोघांचीही नावे घेतली. त्याशिवाय त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबतही गंभीर वक्तव्य केलेय. अटक होण्याआधी आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बोलणं झाले, सगळ्या नेत्यांनी शीट तपासा, फडणवीससाहेब तुम्हाला काही दिले असेल तर चेक करा, असेही ते म्हणाले.
आमच्याकडे आरोपींचे गुप्त रेकॉर्डिंग
यावेळी जरांगे यांनी आमच्याकडे आरोपींचं गुप्त रेकॉर्डिंग आहे, असे म्हणत पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींना बऱ्याच गोष्टी माहीत आहे. त्यांना सिरीयस घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गाडीमध्ये सीटखाली मोबाईल ठेवण्यात आले आहेत. जीपीएस ट्रॅकर लावले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान या प्रकरणात जालना पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्याबद्दलही मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय विषय आहे हा त्या पोरांना माहिती आहे. बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल देखील त्यांना माहिती आहे. वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत. पण ही नसली टोळी संपणे गरजेचे आहे. आरोपीकडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल खूप काही माहिती आहे. पंकजा मुंडें बद्दल खूप घाण विचार आहेत. जे सत्य आहे ते तुम्ही त्या आरोपीकडून काढा. आरोपीकडे कराड, सुरेश धस, संतोष देशमुख यांच्या भावाबद्दल देखील माहिती आहे, असा गंभीर आरोप केलाय.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे भाऊ बहीण आहेत, म्हणून मी हे म्हणत नाही. आरोपींनी आम्हाला हे सांगितले आहे. आम्हाला त्यांनी कराडबद्दल आणि सुरेश धस यांच्याबद्दलही सांगितले आहे, असे जरांगे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




