आंतरवाली सराटी | Antarwali Sarati
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले असून त्यांनी थेट धन्या म्हणत आणि ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडेंवर पलटवार केला. तसेच, उद्याच मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
धन्या मी तुझ्यासारखा नाही, जातवाण आहे
माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाही, त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे, हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली, राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही. मला माहिती मिळाली होती मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली. घातपाताच्या प्रकरणात आठ-दहा जण आहेत, त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्याप्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायचं म्हणत असेल तर मी पण नार्कोटेस्ट करुन घ्यायला तयार आहे. उद्या मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार आहे. धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे, आरोप नाही केले. मी असे खुनाचे, घातपात करण्याचे आरोप नाही करु शकत. नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
‘तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात घातला म्हणून पकडला गेला असे म्हणत जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली. अटक केलेल्या दोन आरोपींची एकमेकांत पैशांची डिल, कधी पैसे मिळणार याची ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकवली. या क्लिपमध्ये आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड याच्यात झालेले संभाषण आहे. धनंजय मुंडे दोन कोटी रुपये देतो म्हणाले, असे दोघांचे संभाषण आहे. हे दोघे गोळ्या आणणार होते आणि जेवणात देणार होते. किंवा गाडी ताफ्यात घालून अंगावर घालायची असा दोघांचा संवाद आहे, अशी क्लिपच जरांगंनी ऐकवली.
देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रीमंडळ तुम्ही तपासणी करा
धन्या तूझा संपर्क नाही का? आरोपींचे सीडीआर काढा, मी आता सोडणार नाही, तू माझ्यावर लोकं उठवले, धन्या तू खूप मोठा सूत्रधार आहे. आता सगळे सीडीआर, ड्रोन मॅपिंग आणि नार्को टेस्ट सगळं करण्यासाठी मी तयार आहे. आम्ही शिवाजी महाराजांची वृत्ती मानणारे लोक आहोत, शत्रू आमच्या दारात आला तर आम्ही त्याला पाहुणा मानतो. धनंजय मुंडे तू अजूनपण शहाणा हो, माझ्याकडे धनंजय मुंडेंच्या पण रेकॉर्डिंग आहेत, मी त्या रेकॉर्डिंग बाहेर काढणार नाही. धनंजय मुंडे तू घातपात घडवून आणण्याचे ठरवले होते. या प्रकरणात तूच मुख्य आहेस. देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रिमंडळ तुम्ही याची तपासणी करा, चेक करा याला, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




