जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे आवाहन केले. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार अंतरवाली सराटी येथे आजपासून उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर आंदोलनस्थळी दाखल होऊन त्यांनी उपोषण सुरू केले. जो पर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आता काहीही झाले तरी माघार घेणार नाही, अशी आक्रमक भुमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिले त्याची व्हॉलिडिटी द्या
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. 58 लाख नोंदीचे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं. आता वेळ देता येणार नाही. आम्हाला गावागावातून फोन आले पाहिजेत. इतकी गती सरकारने घ्यायची आहे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले त्यांची व्हॉलिडीटी द्या. हैदराबाद गॅझेटमधील संख्येनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्हाला सांगतो, करतो म्हणायचे नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिले त्याची व्हॉलिडिटी द्या. सरकारला आता पळायला जागा नाही. ते कोणी अर्ज केला नाही म्हणून म्हणू शकत नाही. औंध, पुणे, सातारा गॅझेटिअरचा जीआर अंमलबजावणी करा, तसेच मराठ्यांनी सरकारवर भरोसा ठेवायचे बंद करा. आपला नेता कोण नाही,” असे त्यांनी म्हटले.
आपण विजयाच्या उंबरठ्यावर
मला उद्यापासून बोलता येणार नाहीये. त्यामुळे आज मी समजापुढेच माझं म्हणणं मांडतोय. आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, आता माघार नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लढतोय, आता हा अखेरचा लढा आहे. गाफील न राहता, घरात बसून न राहता आता मुंबई असो किंवा अंतरवाली सराटी असो आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले.
सुप्रिया सुळेंचं माहित नाही, पण रोहित पवारांकडे…, लक्ष्मण हाके यांचा मोठा गौप्यस्फोट
राजकीय नेत्यांना इशारा
यावेळी राजकीय नेत्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, “आपल्या गावातील कोणता राजकीय नेता आंदोलनात आला नाही हे फक्त मला सांगा. सरपंच, सभापती, सदस्य, नगरसेवक, महापौर, जिल्हाप्रमुख, माजी- आजी सर्व आमदार, खासदार माजी मंत्री, संस्थावाले, श्रीमंत मराठा, नोकरदार हे बाहेर पडले नाहीत तर फक्त मला सांगा. पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवणार, असा थेट इशारा त्यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख १३ मागण्या:
१. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप: निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.
२. हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी: हैदराबाद गॅझेटिअरचा केवळ जीआर (शासन निर्णय) काढण्यात आला आहे, परंतु त्यातील संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. नोंदींनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि त्याची व्हॅलिडिटी (जातीचे वैधता प्रमाणपत्र) कशी देणार, हे स्पष्ट करावे.
३. इतर संस्थानांच्या गॅझेटिअरचा जीआर: सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटिअरचा तातडीने जीआर काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी.
४. गुन्हे मागे घेणे: अंतरवाली सराटीतील गुन्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
५. स्वतंत्र मंत्रालय: मराठा समाजासाठी ‘मराठा आणि कुणबी’ असे स्वतंत्र मंत्रालय तत्काळ स्थापन करण्यात यावे.
६. प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी: ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना आजच्या आज प्रमाणपत्रे द्यावीत. तसेच ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना लगेचच व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावे.
७. ओबीसी सवलतींचा जीआर: मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सोयी-सुविधा आणि सवलती देण्याबाबत काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी करावी.
८. ‘सारथी’च्या योजना आणि शिष्यवृत्ती: ‘सारथी’ संस्थेच्या सर्व प्रलंबित योजना सुरू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वितरीत करावा आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
९. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना मदत: मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्यात यावी.
१०. शिंदे समितीचे काम पूर्ववत: शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच पुन्हा जुने रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्यावेत.
११. विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या: EWS, SEBC आणि ESBC प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा तरुणांना आजच्या आज नियुक्ती पत्रे देण्यात यावीत.
१२. अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा: अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांनी वाहने घेतली आहेत, त्यांचा प्रलंबित असलेला संपूर्ण व्याज परतावा सरकारने आजच्या आज जमा करावा.
१३. ‘सगे-सोयरे’ अधिसूचना: ‘सगे-सोयरे’बाबतच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.




