जालना । Jalana
सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १३ आगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आज दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन मी माझं उपोषण स्थगित करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
मनोज जरांगे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी देत यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसं केलं. माझं कुणीही ऐकलं नाही. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर
आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं. पण आता सलाईन लागल्यामुळं उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळं आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळं आज दुपारी मी माझं उपोषण सोडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन
जरांगे पाटील म्हणाले, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले होते, आम्ही मनोज जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांना १३ जून ते १३ जुलैपर्यंतचा अवधी दिला होता. त्यांना अजून एक महिना हवा होता. यावर मी विचार केला की इथे पडून राहिलो तरी त्यांना तो वेळ मिळणारच आहे. त्यापेक्षा मी आता ठरवलं आहे आता हे आंदोलन स्थगित करेन आणि सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ देईन. माझं आवाहन आहे, १३ ऑगस्टपर्यंत तुम्ही करून दाखवा, तुम्ही दोन महिने मागितले होते, १३ जून ते १३ ऑगस्टपर्यंतचे दोन महिने घ्या आणि मराठ्यांना आरक्षण देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा.
जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट!
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता न्यायालयाने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.
पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पैसे दिले गेले नाही. निर्मात्याने कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा