मुंबई | Mumbai
गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आता या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून ५ जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असे सांगितले.
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, येत्या ५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा नसता पुन्हा आंदोलन उभे करणार असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.
सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत, आमच्याकडून तिघांचे अभिनंदन, पण आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
गुर्मीत आणि मस्तीत जगायचं नाही, जनतेने कौला दिला म्हणून नाटके नाही करायचे, समाजाला सांभाळायला शिकायचे, अंगावर माणसे नाही घालायचे, अंगावर जायला यायला तुमच्याकडे आहे तसेच प्रत्येकाकडे आहेत असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असे फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचे अभिनंदन करेल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आम्ही आमच्या उपोषणाची तारीख जाहीर करू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.