Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआता निवडणुकीत टांगा पलटी करायचा…; निवडणुकीला नवं वळण मिळणार?

आता निवडणुकीत टांगा पलटी करायचा…; निवडणुकीला नवं वळण मिळणार?

नाशिक | Nashik
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला. समोरोपाच्या दिवशीही जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्याच नाशिकमध्ये जावून छगन भुजबळ म्हणजे नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसंच माझ्या नादी लागला तर जिल्ह्याच्या बाहेर प्रचाराला देखील बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर २९ ऑगस्टला नाशिकमधल्या मराठा समाज बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

यावेळी जरांगे म्हणाले, कुणबी आणि मराठा एक आहे. त्यामुळे कोणीही आडले आलेच तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहे. गावागावांतील मराठ्यांनी २९ तारखेला अंतरवलीला या, पाडायचे की उभे करायचे हे २९ तारखेला ठरवू, आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचे आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पक्ष आणि नेत्याला बाप मानण्या ऐवजी समाजाला बाप माना. आरक्षण मिळत नाही म्हणून आपली लेकरे मोठी होत नाहीत. सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचे नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देत नाही, असे दिसतेय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

‘परत एकदा मुंबईला चक्कर हाणावी वाटते. समाज म्हणतोय एकतर निवडणूक लढवा. नाहीतर मुंबईला मोर्चा घेऊन चला, तुम्ही येणार असाल तर जावू मुंबईला, मराठे एकतर एकत्र येत नाहीत आणि एकत्र आले तर इतिहास घडतो. आपला विषय आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. कोणी जरी आडवा आला तरी कुणी थांबवू शकत नाही. २९ तारखेला पाडायचे का निवडून आणायचे ठरवणार’ असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवलीला येण्याचं निमंत्रण दिलेय.

निवडणुकीत टांगा पलटी करायचा
मराठा ओबीसी आरक्षणात आहे. काही झाले तरी आरक्षण मिळवून द्यायचेय. सगळ्या पक्षातील मराठ्यांनी जागे व्हा. पक्षाला बाप माणण्यापेक्षा जातीला बाप माना आणि निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. आरक्षण नसल्याने आपले लोक आणि विद्यार्थी मोठे होत नाही. हे बोंबलू नका. ४५ वर्षापासून यांनी फसवलेय. आता निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचाय,आघाडी आणि युती काय बैठक घेत नाही, असा आरोपही मनोज जरांगेंनी केला.

राणेंविरोधात बोलताना तारतम्य ठेवा
मराठा बांधवाना आवाहन करताना जरांगे म्हणाले, नारायण राणे यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगून बोला, राणे साहेब वयाने मोठे आहेत. त्यांच्या पोरांच काही नाही जाऊ द्या.. राणेंनी फडणवीसांच्या नादी लागू नये, कशाला तंगड्यात तंगडे घालतात, आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यामुळे त्यांनी विचार करावा, मी मागे लागलो तर सोडत नाही. उगाचच म्हणतात मराठवाड्यात येतो, कशाला येता? तुमचा आम्ही सन्मान करतो, खुपच सय्यम ढासळला तर पुढे बघून घेऊ.. असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या