अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मनोज जरांगे यांच्या शांतता व जनसंवाद रॅलीत चोरट्यांनी डाव साधत अनेकांचे मोबाईल, पैसे चोरले. कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रॅलीतून 14 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यात एक महिला व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून चारचाकी, दुचाकी वाहनांसह मोबाईल असा सहा लाख 67 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे.
विजय अशोक माने (वय 22), अजिनाथ आण्णा गायकवाड (वय 60), नागु आण्णा गायकवाड (वय 54, तिघे रा. मिलिंदनगर, जामखेड), सचिन विष्णु खामकर (वय 38 रा. प्रेमदान हाडको, नगर), आण्णा बाळू पवार (वय 51), शामराव रामा गायकवाड (वय 22), बबलू रोहिदास साठे (वय 25), शितल रावसाहेब काळे (वय 24), विकास रमेश गायकवाड (वय 20, सर्व रा. मिलिंदनगर, जामखेड), अर्जुन तुळशीराम जाधव (वय 20 रा. सुपा, ता. पारनेर), मच्छिंद्र दशरथ गायकवाड (वय 26 रा. मिलिंदनगर, जामखेड), राहुल शरद पवार (वय 20 रा. नान्नज जवळ, जामखेड), सागर बाळू रिटे (वय 25 रा. कुंभार तळ, जामखेड) व एका अल्पवयीन मुलगा अशा 14 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरांगे यांची रॅली सोमवारी दुपारी केडगावात आली असता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार व्ही. एम. वाघमारे, सलीम शेख, अतुल काजळे हे केडगावातून रॅलीसोबत होते. त्यादरम्यान अंमलदार वाघमारे यांना माहिती मिळाली की, रॅलीमध्ये काही व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले आहेत. अंमलदार वाघमारे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल दळवी, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, सतीष शिंदे, अनुप झाडबुके, सत्यम शिंदे, सचिन लोळगे, दीपक रोहकले, तानाजी पवार यांना संशयित चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पथकाने एक चारचाकी व दोन दुचाकीसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे विजय माने, अजिनाथ गायकवाड, नागु गायकवाड असे सांगितले. त्यांनी रॅलीत इतर साथीदारांसह चोरी करण्याचे उद्देशाने घुसलो असल्याचे सांगून साथीदारांनी चोरीचा मुद्देमाल आमच्या ताब्यात दिला असल्याची कबूली दिली. त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी, दोन दुचाकी, सहा मोबाईल असा सहा लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर इतर 11 जणांना पोलिसांनी रॅलीतून ताब्यात घेतले. यामध्ये एक महिला व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधणार
केडगाव उपनगरातील शिवाजीनगर येथील कांदा व्यापारी प्रतिक श्रीधर कोतकर यांच्या खिशातून 10 हजार तर त्यांचे मित्र शरद बापुराव अनवणे यांच्या खिशातून 55 हजार रूपये असे एकुण 65 हजार रूपये चोरीला गेले. सदरचा प्रकार जरांगे यांच्या रॅलीत असताना घडला आहे. ते दोघे केडगाव येथून रॅलीत सहभागी झाले होते. या प्रकरणी कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.