जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले. मात्र, त्यावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी विखे पाटील यांच्यावर थेट शब्दांत टीका केली.
मराठा समाजाच्या दृष्टीने सरकारला जे निर्णय घेणे शक्य होते ते निर्णय घेतले, आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे, अशी सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी सरकारी शिष्टमंडळ आता चर्चा करणार नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे जरांगे पाटील चांगलेच संतापले.
वर्षभर तुणतुणे वाजवले
मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर टीका करताना म्हणाले, विखे-पाटील मराठ्यांचे वाटोळे करत आहे. फक्त फडणवीसचे गुणगान गायचे आणि शरद पवारने काहीच दिले नाही एवढेच तुणतुणे यांनी वर्षभर वाजवले. मराठ्यांना मोठं करण्याचा विडा घेतला तर अपमान पचवायची ताकद ठेवा. तुम्ही वर्षभर मराठ्यांना कशाला नाचवले? असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.
समजून घ्यायला सरकार काय बाप आहे का आमचा?
विखे पाटील म्हणतात की सरकारची भूमिका समजून घ्या. समजून घ्यायला सरकार काय बाप आहे का आमचा? मराठ्यांचे वाटोळे करणारा विखे निष्क्रिय मंत्री आहे. तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलकांना हात तर लावून दाखवा, तुम्हाला उभे राहायला जागा राहते का हे बघा. विखेंनी फडणवीसांचे स्वप्न पूर्ण केले. विखेंनी मराठा क्रांती मोर्चा फोडला. विखे सोडून अजून दोन मंत्री आमदार मराठ्यांच्या विरोधात आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे
तुमचे ठरले आहे मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करायचा. याला पाऊल म्हणतात का, आम्ही कधीच अंतरवालीमध्ये जाणार नाही. तुम्ही मराठ्यांना कलंक आहात. तुम्हाला अंतरावलीमध्ये कोण ये म्हणते. ते येणार म्हटले आता येत नसतील तर नको येऊ. तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू, अशी घणाघाती टीका जरांगे पाटील यांनी केली.
मी सगळ्यांना गुडघ्यावर आणणार
नगर जिल्ह्यातले खूप नेते मला सांगत होते की विखे दगाबाज माणूस आहे. पण तो सध्या हतबल माणूस आहे, हे मला जाणवते आहे. समाजाची बाजू सोडून तो सरकारची बाजू मांडत आहे. त्यांच्या कंबरड्यावर पाय देण्याची आमची क्षमता आहे. मी सगळ्यांना गुडघ्यावर आणणार, असेही जरांगे म्हणाले.



