मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ११ वा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांची तब्येत अजून खालावली आहे. मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधला त्यानंतर त्यांनी बंद केलेले उपचार पुन्हा सुरु केले. आज पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याची माहिती समोर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता निर्णय करत आहोत
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जे जे निर्णय घेता येणे शक्य होते, तेवढे निर्णय घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनाही अवगत केले. तरीही जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही. शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता आपण निर्णय करत आहोत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यांनी आता आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती करतानाच आता त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीला जाणार नाही, अशी कठोर भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.
तर त्यांच्याशी चर्चा नको, नेत्यांची मानसिकता
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आदी नेते उपस्थित होते. सरकारने सकारात्मक निर्णय घेऊनही जरांगे पाटील जर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत असतील तर त्यांच्याशी चर्चा नको, अशी मानसिकता नेत्यांनी बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘भाकरी फिरणार’! काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत मोठ्या बदलांची तयारी; १०० नेत्यांची यादी तयार
ज्यांनी काम केले त्यांना तुम्ही नावे ठेवत आहात
विखे पाटील पुढे म्हणाले की, “५८ लाख नोंदी आम्ही ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावण्यात आल्या आहे. लोकांनी अर्ज केले आहेत. ५२० अर्ज आले. २४० अर्ज केवळ दाखले काढण्यासाठी होते. जशी वस्तुस्थिती पुढे येईल, वंशावळ बदल असतील त्याचे दाखले मिळतील. जे कोणी दिले नाही ते या दोन नेत्यांनी पुढे येऊन काम केले आहे. ज्यांनी काम केले त्यांना तुम्ही नावे ठेवत आहात. मराठी समाज हे मान्य करणार नाही. सरकार सकारात्मक नसेल तर भाग वेगळा होता. पण, 25-30 वर्षात असे चांगले निर्णय झाले नाही,” असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेवर भाष्य केले.
आम्ही जी निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे होती, ती आम्ही केलेली
पुढे ते म्हणाले “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना आरक्षणम घालवले. सरकार नेहमीच एक पाऊल पुढे आले आहे आणि आता जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले पाहिजे की सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका झाली आहे. त्यांनी काय अल्टीमेटम द्यावा हा त्यांचा निर्णय आहे. सरकार म्हणून आम्ही जी निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे होती, ती आम्ही केलेली आहे.
जर सरकारने मागण्यांसंदर्भात फेरविचार केला नाही तर मुंबईला मोर्चा घेऊन येण्याचे जरांगे पाटील यांचे नियोजन आहे, असे विचारले असता, ‘पुढे काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, सरकारचा नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
शिष्टमंडळ कुठे जाणार नाही
जरांगे पाटलांची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार का? याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिष्टमंडळ कुठे जाणार नाही. आम्ही आमचे निर्णय केलेले आहेत. या निर्णयाप्रती त्यांनी सरकारला प्रतिसाद दिला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्याकडे जे पर्याय होते ते सगळे करून झाले आहेत, राजकारण यात आणायचे नाही, प्रश्न सुटला पाहिजे, आज न्यायमूर्ती शिंदे संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून या नोंदणी शोधल्या गेल्या आहेत, आता मार्ग जरांगे पाटील काढतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.




