बीड | Beed
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा बीडच्या नारायणगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे आजारी असूनही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत शेतकर्यांसाठी काही मागण्या देखील केल्या.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. तसेच हेक्टरी ७० हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा. नदीच्या कडेला शेती वाहून गेली आहे अशा शतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ३० हजार रुपयांची मदत करा. २० वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा शेतकऱ्यांच्या कटुंबीयांना नोकरी द्या. पिकांना हमी भाव द्या, तसेच शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो १० एकरच्या आत शेती करेल त्याला १० हजार रुपये महिना पगार द्या. पीक विम्यााला तीन ट्रिगर बसवले ते उठवा, अशा मागण्यााही जरांगे यांनी केल्या.
पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर जिल्हा परिषद नगरपरिषदेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. गावागावात बॅलेट पेपर लावू देणार नाही. अंबानी, टाटा बजाजवाले आणखी काही आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या. निवडणुकीवेळी देणग्या देणाऱ्या उद्योगपती आणि व्यापाऱ्यांकडून पैसे घ्यावेत. बॉलिवूड अभिनेत्यांकडूनही पैसे घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
थोड्या दिवसाचा पाव्हणा
आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं पाहायचं आहे. मागे कोणी हटू नका. कुणी मागे सरकू नका. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आता साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली आपण जीआर घेऊन लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा असो की लय दिवसाचा. मला चिंता राहिली नाही, असंही जरांगे यांनी यावेळी म्हटले.
राजकीय नेत्यांच्या संपत्तीतून पैसे घ्या
महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना द्यावा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रॉपर्टी कमी आहे का? शिंदे साहेबाकडे काय रोग आलाय का? त्यांचे कापा. उद्धव ठाकरेंकडे काही कमी पडलं का? शरद पवारांकडे पुरी काडीच लागली का? काँग्रेसच्या सोनिया गांधी असतील यांच्याजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली. राज ठाकरे, नारायण राणे यांच्याकडे काय कमी आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.





