Friday, November 15, 2024
Homeराजकीयनगरच्या राजकारणाची सूत्रे मुंबईतून हलली

नगरच्या राजकारणाची सूत्रे मुंबईतून हलली

अहमदनगर (प्रतिनिधी)

मुंबईतून आदेश आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार योगीराज गाडे यांनी माघार घेतल्याने स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. सभापती पदी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. कोतकर यांच्या रुपाने केडगावला प्रथमच सभापती पदाची संधी मिळाली आहे.

- Advertisement -

आज शुक्रवारी स्थायी समिती सभापती पदाची ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. उेमदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काल गुरूवारी राष्ट्रवादीकडून मनोज कोतकर आणि शिवसेनेचे योगीराज गाडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. सभापती पदासाठी दोघांतच सरळ लढत होणार हे कालच स्पष्ट झाले होते.

आजच्या ऑनलाईन सभेला अपेक्षेप्रमाणे सर्वच 16 सदस्य बैठकीला उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरू होताच शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी नगरसचिव एस.बी. तडवी यांना व्हॉटस्अपवर संदेश पाठवत उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याचे सांगितले. तडवी यांनी हा संदेश पीठासीन अधिकारी तथा कलेक्टर राहुल द्विवेदी यांना दाखविला. त्या संदेशाची प्रिंट काढण्यात आली. त्यानंतर कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी गाडे यांच्याशी संपर्क साधत माघारीसंदर्भात खातरजमा केली. गाडे यांनी संमती दर्शविल्यानंतर त्यांचा अर्ज माघारी घेण्यात आला. सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

… अन् गाडे राजी झाले

भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी काल अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे अचानक उमेदवारी बदलली. शाम नळकांडे यांच्याऐवजी योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्रभर गुप्त बैठका सुरू होत्या. शिवसेना नगरसेवसकांची बैठक संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी घेतली. तेथूनच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. नार्वेकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीने पाऊलं टाकत आता शिवसेनेच्या उमेदवारांनी माघारी घ्यावी. महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी साथ देईल त्यादृष्टीने माघारीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मुंबईचा निरोप कळविला. त्यानंतर गाडे यांनी माघार घ्यावा असा निर्णय झाला. पराभवाची चिंता नाही, पण निवडणूक लढवू अशी भूमिका योगीराज गाडे यांनी मांडली. पण महाविकास आघाडीचा धर्मानुसार ते करणं योग्य नाही अशी समजूत काढत गाडे यांनी माघारीसाठी राजी करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी सभा सुरू होताच त्यांनी ऑनलाईन माघार घेतली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या