Wednesday, October 30, 2024
Homeनगरमनोली ग्रामपंचायतचा शिपाई होणार आता सरपंच

मनोली ग्रामपंचायतचा शिपाई होणार आता सरपंच

कोकणगाव |वार्ताहर| Kokangav

संगमनेर तालुक्यातील मनोली ग्रामपंचायत सरपंचपदी ग्रामपंचायतचे माजी कर्मचारी अशोक पराड यांच वर्णी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

पराड कुटुंबियांची तीन पिढ्यांची निष्ठा फळाला आल्याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी देऊन अशोक भागाजी पराड यांचे अभिनंदन केले आहे.

27 जानेवारी रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मनोली येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले. या ग्रामपंचायतीत अशोक पराड हे एकमेव अनुसूचित जातीचे विजयी उमेदवार असल्याने सरपंचपद त्यांच्याकडेच आपसूक चालत आल्याने त्यांची आता सरपंचपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पराड कुटुंबियांच्या तीन पिढ्यांची आपल्या कामाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा फळाला आल्याची प्रतिक्रीया मनोली येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

प्रामाणिक कामाचे फळ उशीरा का होईना मिळते असे आपले वाड-वडील आपल्याला सांगून गेले आहेत. त्याची प्रचिती नुकतीच मनोली ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत जनतेने अनुभवली आहे.

अशोक भागाजी पराड हे मनोली ग्रामपंचायतमध्ये 23 वर्षे शिपाई या पदावर तर काही काळ क्लार्क या पदावर काम करत होते. त्याआधी त्यांचे वडील भागा कृष्णा पराड हे मनोली-रहिमपूर-ओझर या ग्रामपंचायत स्थापनेपासून ते 1987 सालापर्यंत म्हणजे 45 वर्षे शिपाई पदावर कार्यरत होते. तर मागील 7 वर्षांपासून अशोक पराड यांचा मुलगा ग्रामपंचायतमध्ये शिपाई या पदावर काम पाहत आहे.

ज्या ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून पुढील पाच वर्षे 10 वीपर्यंत शिक्षण घेतलेले अशोक पराड आता सरपंच पदाच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत. तर सह्यांसाठी फाईल पुढे करणारे अशोक पराड यांच्या समोरच आता फाईल येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परमेश्वर प्रामाणिकपणाचे फळ देतच असतो, अशी प्रतिक्रीया धनसंपदा पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब ठोसर यांनी देऊन पराड यांना शुभेच्छा दिल्या.

विखे प्रणित जनसेवा मंडळाचे एकूण 9 उमेदवार विजयी झाले असून थोरात गटाला अवघ्या दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जनसेवा मंडळाचे सर्व ज्येष्ठ नेते तसेच तरुण कार्यकर्त्यांनी अशोक पराड यांचे अभिनंदन केले आहे.

कुटुंबियाच्या आग्रहाखातर मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. त्यामध्ये मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी चांगल्या मताधिक्याने विजयी झालो. आता माझी सरपंचपदी वर्णी लागणार असल्याने आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाची ग्रामपंचायतीसाठी असलेली प्रत्येक योजना सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार असून घरकुल योजना, शुध्द पिण्याचे पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट आदिबरोबर कोणताही द्वेषभाव न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासकार्य नेण्याचा आमचा मानस राडक्षल.

– अशोक पराड, सरपंच पदाचे उमेदवार मनोली

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या