संगमनेर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यातून अनेकजण येण्यास इच्छुक झाले असून पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण असून त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. वेळ येईल तेव्हा सर्वच जाहीर होईल. संगमनेरमध्ये सुध्दा अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकीमध्ये सुध्दा मोठे परिवर्तन होईल, असे सूचक वक्तव्य जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महायुतीच्यावतीने संगमनेरात शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमानंतर मंत्री विखे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी नुकत्याच घेतलेल्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, सुनीता भांगरे आणि अमित भांगरे यांनी भेट घेतली, या भेटीप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड सुध्दा उपस्थित होते. अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट करून जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस निश्चित होईल. अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. संगमनेर तालुक्यातून कोणी इच्छुक आहे का? या प्रश्नावर बोलताना वेळ येईल तेव्हा सर्व नावे पुढे येतील, असे सूचक वक्तव्य केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमधील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ना. विखे पाटील म्हणाले, ना. गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांनी कोणत्या संदर्भाने विधान केले मला माहीत नाही. परंतु नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेला आहे. सर्वांच्या समन्वयाने राज्यात महायुतीचे सरकार येवू शकले. पक्षाचा विस्तार सुध्दा सर्वांचा मेळ घालून होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
फलटण येथील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, या घटनेतील कोणत्याही आरोपींना पाठिशी घातले जाणार नाही. अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाने या भगिनीचा जीव गेला असेल तर त्यांच्यावर सुध्दा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच नेवासा तालुक्यातील घटना मानवतेला काळिमा फासणारी असून, यासंदर्भात पोलीस उपमहासंचालक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली आहे. आरोपी कोणीही असो कारवाई होणारच. मात्र संघाच्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून कोणी स्वतःचा बचाव करीत असेल तर ते शक्य होणार नाही. पोलीस चौकशी करून दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करतील.




