अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही मराठा समाजाचे प्रतिनिधी शुक्रवारपासून (20 सप्टेंबर) आमरण उपोषणास बसले आहेत. आता नगर जिल्हा मराठा समाजाच्यावतीने आज सोमवारी (23 सप्टेंबर) जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अखंड मराठा समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत रविवारी निवेदन देण्यात आले आहे.
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन तिचे कामकाज चालू ठेवावे, मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने अखंड मराठा समाजाच्यावतीने नगर तहसील कार्यालय येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ हे आमरण उपोषणास बसले आहेत. आता आज समाजाच्यावतीने जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. बंद दरम्यान अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आपापल्या हद्दीत पोलीस बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर शहरातही तोफखाना व कोतवाली पोलिसांना बंदोबस्त लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये उपोषण व जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजातील युवकांच्या वतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दिल्लीगेटपर्यंत शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. उपनगर भागातही नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.