Sunday, May 26, 2024
Homeनगरमराठा आरक्षण मागणीसाठी नगरसेवक कोतेंसह तिघे चढले पाण्याच्या टाकीवर

मराठा आरक्षण मागणीसाठी नगरसेवक कोतेंसह तिघे चढले पाण्याच्या टाकीवर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी शिर्डी नगरपंचायतचे माजी नगरसेवक मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते व इतर दोन सहकाही समाज बांधवांनी शिर्डी नगरपरिषद कार्यालया जवळच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले यावेळी त्यांनी शासनाचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, अशी घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला होता. सदरची घटना पोलीस प्रशासनाला समजताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नगरसेवक दत्तात्रय कोते, प्रतीक शेळके, अनिल शिरसाट हे तीन मराठा समाजबांधव सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हातात भगवा ध्वज घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून ‘एक मराठा लाख मराठा’ यासह आरक्षणाच्या मागणी संदर्भातील घोषणा करत होते. अखेर टाकीच्या खाली पोलीस अधिकारी व कर्मचारी आले त्यानंतर त्यांनी संबंधित नगरसेवक दत्तात्रय कोते तसेच त्यांचे सहकारी प्रतीक शेळके व अनिल शिरसाट या सर्वांना टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली तसेच खाली उभे असलेल्या सकल मराठा समाज बांधवांनी सुद्धा आपल्या जीवाचं काही बरं वाईट न करता तुम्ही खाली उतरा अशी विनवणी केल्याने नगरसेवक दत्तात्रय कोते व त्यांचे दोन सहकारी टाकीवरून खाली आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र त्यानंतर माध्यमांशी बोलताना दत्तात्रय कोते व त्यांचे सहकारी म्हणाले की, शासनाने त्वरित मनोज जरांगे पाटलांच्या मागणीची व उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तसेच जरांगे पाटलांच्या जीविताची काळजी घेतली नाही तर यापुढे सकल मराठा समाज बांधव शिर्डी शहरात वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करून राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दत्तात्रय कोते व शेळके तसेच शिरसाट यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या