अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता व जनसंवाद रॅलीचे सोमवारी दुपारी नगर शहरात आगमन झाले. माळीवाडा बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी रॅलीला सुरूवात केली. वेशीजवळ क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. नगरकरांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. दरम्यान, ‘वाघ एकला राजा’, ‘मराठा खडा तो सरकार से बडा’ असे घोषवाक्य असलेले व छत्रपती शिवाजी महाराज व मनोज जरांगे यांचे फोटो असलेले बॅनर्स घेऊन हजारो समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी महापौर अभिषेक कळमकर, विविध पक्षांचे नगरसेवक, मराठा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तत्पूर्वी, केडगाव येथे जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करून व क्रेनच्या साहाय्याने सुमारे दीडशे किलो वजनाचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. माणिक चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. रॅली मार्गावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी मराठा समाज बांधवांसाठी नाश्ता, पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. माळीवाडा, पांचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता मार्गे रॅली चौपाटी कारंजा येथे पोहचली. तेथे जरांगे पाटील यांची जनसंवाद सभा होऊन रॅलीची सांगता झाली. सभा संपल्यानंतर जरांगे यांचे सावेडी गावात सुमारे 15 जेसीबीतून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्खेने सावेडी ग्रामस्थ उपस्थित होते.
चोरट्यांनी डाव साधला
दरम्यान, रॅलीत चोरट्यांनी डाव साधत अनेकांचे मोबाईल, पैसे चोरले. जिल्ह्याबाहेरून आलेल्या चोरट्यांच्या टोळीनेही रॅलीत धुमाकूळ घातला. काही चोरटे गाड्या करून शहरात आल्याचे तपासात समोर आले. कोतवाली पोलिसांनी डझनभर संशयित चोरट्यांची टोळी ताब्यात घेतली आहे. त्यात एका महिला चोरांचाही समावेश आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या, मनोज जरांगे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुमारे अडीच हजार स्वयंसेवकांनी सेवा केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वात सुमारे 500 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात केला होता. न्यू आर्टस् कॉलेज, क्लेराब्रूस हायस्कूल मैदान, फटाका मार्केट मैदान, कल्याण रोड, मार्केट यार्ड, नेमाने इस्टेट, केडगाव, गाडगीळ पटांगण इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
भगवेमय वातावरण
‘वाघ एकला राजा’, ‘मराठा खडा तो सरकार से बडा’ असे घोषवाक्य असलेले व छत्रपती शिवाजी महाराज व मनोज जरांगे यांचे फोटो असलेले बॅनर्स घेऊन समाज बांधव सहभागी रॅलीत सहभागी झाली होते. डोक्यावर ‘हम सब जरांगे’, ‘एक मराठा लाख मराठा’ वाक्य असलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवा पंचा घालून लोक सहभागी झाले होते. रॅली मार्गावर मनोज जरांगे यांचे भव्य बॅनर्स लावण्यात आले होते. डिजेच्या तालावर लोकांनी ठेका धरला होता.