Friday, October 11, 2024
Homeब्लॉगअपेक्षांचं ओझं

अपेक्षांचं ओझं

मुलांवर संस्कार करतांना आई-वडील म्हणून आपण खूपच जागरूक राहायला हवं. कारण आपल्या छोट्या- छोट्या चुकांमुळे मुलांचे आयुष्य खराब होऊ शकते. त्यांच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि ते मानसिकरित्या कमजोर होऊ शकतात. तसे तर सर्वच पालक आपल्या मुलांचे भविष्य चांगले घडवण्याचा प्रयत्न सतत करत असतात. त्यांना त्यासाठी जे-जे काही शक्य आहे ते- ते मुलांना देण्याचा ते प्रयत्न करत असतात. अगदी गरिबीतही मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी ते झटत असतात. पण नकळतपणे का होईना हातून चूक घडली तर त्याचा परिणाम मुलांवर होत जातो. बऱ्याचदा लहान मुलांना सगळीकडेच लाडात वाढवले जाते. त्यांचे बालहट्ट पुरवले जातात आणि अचानक काही प्रसंग समोर आला तर पालकच पुढे होवून त्या प्रसंगाला हाताळतात किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग मुलांना पुढे जर का असा प्रसंग, काही समस्या उदभवल्या तर ते घाबरतात. त्या परिस्थितीत काय निर्णय घ्यावा, यातून बाहेर कसे पडावे हे कळत नाही.

मग ते आई वडिलांची अपेक्षा करतात. म्हणून मुलांना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ द्यावा. त्यामुळे ते आत्मनिर्भर बनतात. आई-वडिलांनीच मुलांना स्वावलंबी बनवले पाहिजे. स्वतःची कामे स्वतः केली पाहिजे. कोणावरही विसंबून राहू नये. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे हे सर्व मुली मुलांना समजवावे. मुले हट्टी असतात पण प्रत्येक वेळी त्यांचा हट्ट पूर्ण करत बसू नये. कारण बरेच पालक म्हणतात लहान आहे अजून मोठा झाला की सुधारेल. पण एकदा का त्याला सवय लागली आणि तो हट्ट पुरवला गेला नाही तर मुलं राग राग करतात. डिप्रेशन मध्ये जातात आणि काही तर आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतात. म्हणून वेळीच त्यांना इच्छा आवरता ही आल्या पाहिजे. अलीकडेच खेळायला मोबाईल दिला नाही तरी मुलं आत्महत्या करतात, आईवडील रागावले म्हणून घर सोडतात असे दिसून येते. प्रत्येकाचेच पालक मुलांना सांगतात आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. पण तू शिकावं, मोठं व्हावं, आयुष्यात सुखी व्हावं एवढेच. अर्थात पालकांची ही अपेक्षा चुकीची नाही कारण मुलांच्या संगोपनात त्यांना जेवढे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतात. मुलांना आनंदात शिक्षण घेता यावं यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पण आत्ताच्या या स्पर्धेच्या युगात आई-वडिलांच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपलाच मुलगा पहिला आला पाहिजे इतरांच्या पुढेच असला पाहिजे असे वाटते. काही तर मुलं जन्माला यायच्या अगोदरच ते काय होणार हे ठरवून ठेवतात. लहानपणापासूनच मोठमोठ्या इंग्लिश स्कूलमध्ये टाकतात.

- Advertisement -

शिकवणी लावतात. त्यामुळे या मुलांचं बालपण कोमेजून जातं काहींना आपल्या मुलाने हे बनाव ते बनाव असं वाटतं किंवा कुणाचा तरी मुलगा, मुलगी काय झाला हे सांगितलं जातं व तसं होण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. पण आपण एक पालक म्हणून हा विचार करावा की आपल्या मुलाला कशात आवड आहे, त्याचा कल काय आहे, तो किती हुशार आहे हे बघूनच निर्णय घ्यावा. उगाचच आपल्या इच्छा त्याच्यावर लादू नये.मुलं ते जे काही करतील त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे पण अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांना दाबून टाकू नये. प्रत्येक मुलाची क्षमता,कुवत वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना स्वतः निर्णय घेऊ द्यावा. उगाच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तगादा लावू नये. नाही तर त्यांच्यात उत्साह राहत नाही. घाण्याच्या बैलासारखी ती जुंपलेली असतात. इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात ते धडपडत राहतात. पण खऱ्या अर्थाने ते जीवन जगत नाही. सतत प्रयत्न केल्यानेच जीवन यशस्वी होते.पण मनासारखे केले तर ते आनंददायी होते. सतत प्रयत्नशील राहिल्याने मुलांमध्ये कणखरपणा येतो ते खंबीर बनतात. पण अवास्तव अपेक्षांमुळे आपली मुलं काही टोकाचा निर्णय घेणार नाहीत ना याचाही विचार करावा. कोणाशीही तुलना करू नये व मुला-मुलीला टोमणे ही मारू नये. त्यामुळे मुलांच्या भावना दुखावल्या जातात आणि हळूहळू ते आपल्या पासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. चांगल्या वाईटाची जाण करून द्यावी.

जगातील प्रत्येक माणसांमध्ये वेगवेगळे कौशल्य आहे. आपल्या मुलात असेच एखादे वेगळे कौशल्य असेल तर त्याला प्रोत्साहन देऊन त्याचे कौशल्य विकसित करून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याच वेळेला आई वडील मुलांमध्ये वाद होतात, मतभेद होतात. हे जनरेशन गॅप मुळे होतात असं नाही. तर त्यांच्यात असणारी विचारांची तफावत याला कारणीभूत असते. प्रत्येकाचेच आई-वडील जीवनात या सर्व अवस्थांमधून गेलेले असतात. पण मुलं मोठी झाली की ते ऐकत नाही, फायद्याचे असेल तरी त्यांना बोललेलं चालत नाही. तेच तेच बोललेलं आवडत नाही. यातून मुलांना राग येतो. समजून सांगायला जावं तर मी मोठा झालोय कळत मला असं ऐकायला मिळतं. इथे मुलं मोठ्यांचा किंवा आई-वडिलांचा अजिबात विचार करत नाही. बऱ्याच जणांना तर आई-वडिलांना काही कळत नाही असंही वाटतं. पण त्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना कळणार नाही म्हणजे काय? हा ही विचार करावा. आई-वडिलांच्या अपेक्षा असतील हे मान्य पण त्यांचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की आपल्या मुलाने आपल्या पेक्षाही चांगले जीवन व्यतीत करावे. काहीतरी चांगले बनावे. कारण प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान असतो. त्यांना सतत मुलांची काळजी असते. मुलांनी काही केले नाही तर आई-वडिलांना नैराश्य येते. मुलाला अपेक्षित यश मिळाले नाही किंवा विचारांचा गैरसमज झाला की काही पालक मुलांशी बोलायचे देखील बंद होतात. म्हणून प्रत्येक पालकाने मुलांकडून योग्य अपेक्षा ठेवल्या पाहिजे ते सहाजिकही आहे. पण मुलालाही संधी द्यावी, थोडा धीर धरावा, शक्य असल्यास आपल्या परीने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे मुलांवर दडपण वाढते. गुण कमी पडले तर आई-बाबा ओरडतील, स्पर्धेत नंबर नाही आला तर रागवतील, अभ्यास पूर्ण नाही केला तर बोलतील असे मुलं बोलतांना आढळतात. म्हणजेच आत्ताची मुलं किती तणावात वाढतात हे आपल्या लक्षात यायला हवे.म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या अपेक्षा न लादता मुलांना तणाव विरहित शिक्षण व आनंददायी जीवन कसे होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या