Monday, October 14, 2024
Homeब्लॉगआयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

आयुष्य हे क्षणभंगुर आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ते आपल्याला मनसोक्त आणि भरभरून जगता आले पाहिजे. खरंतर आयुष्य म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नेमके देता येणार नाही. पण आपण प्रत्येकाने त्याची एक परिभाषा शब्दात मांडून ठेवलेली आहे. नेहमीच म्हटले जाते की आयुष्य हे एक कोड आहे. खरोखरच आयुष्य एवढे अवघड आहे का? त्यात कितीही गुंतागुंत असली तरी ती सोडवता येणार नाही का? आयुष्यात अनेक चांगल्या, वाईट घटना घडत असतात. त्यानिमित्ताने अनेक लोक आपल्या आयुष्यात येत जातात आणि अशी ही चांगली माणसे आयुष्यात आली की ती आपल्याला समृद्ध बनवतात. आयुष्याची बेरीज करतात आणि अशी नाती आपल्याला मोठे बनवतात. पण कित्येक वेळा अशाही कितीतरी गोष्टी असतात त्या हव्या असतांनाही आपल्या हातातून निसटून जातात. आपल्या आयुष्यातून वजा होत जातात. म्हणून जीवन जगतांना फार अपेक्षा न ठेवता ज्या-ज्या गोष्टीतून आनंद मिळेल तो घ्यायला हवा.

सध्याचे युग धावपळीचे, धकाधकीचे आहे. कुणालाही कुणासाठी वेळ नाही आणि या धावपळीत वयाची पन्नाशी कधी संपली हे लक्षातही येत नाही. पण आता तरी आपण जागे झाले पाहिजे. मनाला जे- जे आवडेल ते-ते केले पाहिजे. जवळचे नातेवाईक मित्र यांना भेटले पाहिजे. बऱ्याचदा भेटू भेटू म्हणता- म्हणता भेटणं होत नाही. आजचे उद्यावर आणि उद्याचं परवावर होऊन जातं आणि भेटणं लांबत जातं. खरं तर आपलं भेटणं महत्त्वाचं की काम यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. कारण आयुष्यात कोणती वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. त्याच दरम्यान एखादा जिवलग आपल्यातून निघून गेला की होणारी मनाची तडफड, वाटणारी हळहळ, मनाला झालेली जखम आणि भेटण्याची राहून गेलेली तळमळ मनाला अस्वस्थ करत असते. मग पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही.

- Advertisement -

मागचीच एक गोष्ट शेजारीच एक शिक्षक राहत होते. दिवसभर शाळेत चांगले राहिले. पण सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना चक्कर यायला लागले म्हणून त्यांना दवाखान्यात नेले. ऍडमिट केले. तपासण्या झाल्या. हे करता करता दोन-चार दिवस निघून गेले. आधी आयसीयू मध्ये असल्यामुळे व डॉक्टर भेटू देत नसल्यामुळे त्यांनी सर्व नातेवाईकांना, जवळच्यांना सांगितले की बरे वाटल्यानंतर घरीच या. यानंतर मात्र दोनच दिवसात त्यांची तब्येत खालावली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सर्व नातेवाईक, जवळची माणसे हळहळ करू लागली. किमान त्याही परिस्थितीत डोळे भरून पाहिले असते,दोन शब्द बोललो असतो पण नाही. वेळ निघून गेली आणि ही सल मनाला टोचत राहिली ती कायमची. असंच घडतं बऱ्याचदा आपण कुणाला भेटायचं ठरवतो, कुठे जायचं ठरवतो. पण नंतर विचार बदलतो आणि आपण आपल्या कामात व्यस्त होऊन जातो. पण काळ काही सांगून येत नाही ना! म्हणून आजची गोष्ट उद्यावर ढकलण्यापेक्षा ती आज, आत्ताच केलेली बरी. नंतर होणारी मनाची तडफड वाढवण्यापेक्षा भेटणं हे महत्त्वाचं.

आमच्या शाळेतही असंच एकदा वर्ग मित्रांचा विद्यार्थी मेळावा होता. सर्वजण एकमेकांना येण्यासाठी सांगत होते. तो दिवसही आला आणि सर्वांना एकमेकांना भेटण्याची घाई झाली होती.फार दिवसांनी भेटण्याच्या आनंदात होते सर्व. भरभरून गप्पा करत होते. पुन्हा वेळ मिळाली की नक्की भेटू म्हणत होते. प्रत्येकाने हे आनंदाचे क्षण आपल्या मोबाईल मध्ये सेव केले होते. पुन्हा भेटण्याच्या बोलीवर सर्वजण गेले होते आणि आठच दिवसात त्यातला एक मित्र हार्ट अटॅक ने गेला. खूप वाईट वाटलं, डोळ्यात अश्रू दाटले. ती भेट,ते हसणं, बोलणं शेवटचं. त्याची आठवण मनात घर करून राहिली. म्हणून म्हणते कितीही धावपळ असेल, काम असेल तरी स्वतःसाठी काही वेळ द्या, तो राखून ठेवा आणि ठेवलाच पाहिजे. नाही फोन करता आला तर मेसेज करा. तुमचा एक मेसेज तुम्ही कसे आहात ते सांगून जातो. दररोज न चुकता येणारा मेसेज आला नाही तर मनात शंकेची पाल चुकचुकते. मित्रांनो खरंतर आपण सर्वच क्षणाचे सोबती आहोत. त्यामुळे कुठलाही अहंभाव, मोठा- छोटा, जात- पात न ठेवता एकमेकांना भेटा, कडकडून मिठी मारा. नेहमी मनात येईल ते बोला.

मनमोकळ हसा,वागा.त्यातच जीवनाचा आनंद आहे. ज्यावेळेस व्यक्तीमध्ये स्वार्थीपणा येतो त्यावेळेस तो या सर्व सुखाला पारखा होतो म्हणून थोडसं थांबलं आणि मागे वळून पाहिलं तर आयुष्य सुंदर आहे हे पटतं. आयुष्याचा शेवट कधी आहे माहित नाही कदाचित उद्याचा दिवस नसेल ही आपल्या नशिबात पण आजचा दिवस तर आपला आहे. आणि तो आपण भरभरून जगला पाहिजे. आनंदाने जगलं पाहिजे. आपले मित्र, नातेवाईक यांपासून मिळणारा आनंद, सुख आपण कुठल्याच पैशाने विकत घेऊ शकत नाही. मित्राने मारलेली कडकडून मिठी आणि त्यातून मिळणारा आनंद तुम्ही कसा विकत घेऊ शकता. म्हणून म्हणते मनात फार साठवून ठेवू नका. मोठ्या मनाने सर्वांना माफ करा. तो बोलत नाही म्हणून मी बोलत नाही. तो फोन करत नाही म्हणून मी करत नाही. पण मित्रांनो थोडं छोटं झालं तर त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. त्यामुळे मनावरचा ताण वाढत नाही.

मनुष्यातील मीपणा,अहंकार, राग, व्देष निर्माण झाला की मनःशांती मिळत नाही. सुख असूनही आपण त्यात होरपळत असतो. त्याचा मनमुराद आस्वाद घेवू शकत नाही.म्हणून जीवनात जे-जे आहे ते उत्तम आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागले पाहिजे. एक चांगल्या किंवा वाईट गोष्टीतून आपलं जीवन घडत असतं. पण त्यातही आनंदात जगता आलं तर ते खरं जीवन. कुणी काहीही बोलू देत आपल्या मनाला जे पटेल, जे रुचेल तेच करावे. सर्वांच्या चेहऱ्यावर जर हास्य आपल्यामुळे फुलणार असेल तर त्याच्या इतकं दुसरं सुख नाही.बऱ्याचदा आपलेच मित्र, स्नेही आपल्याला मानसिक त्रास देतात. पण ते सोडून जर आयुष्य जगता आलं तर ते खरे आयुष्य. समाजात सगळेच आपल्या विचारांचे नसणार ना, मग वाईट वाटून काय घ्यायचे. जीवन सुंदर आहे आणि ते भरभरून जगलेच पाहिजे नाही का? आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य नाही.

पण आपल्याकडे जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती प्रचंड असायला हवी. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं गणित मांडलं तर प्रत्येकालाच वाटेल की आपलं काहीतरी राहून गेलं. प्रत्येकानेच प्रत्येकाचं आत्मपरीक्षण केलं की आपण कुठे चुकलो याची जाणीव होते.त्यामुळे आपल्या पासून कोणी दुखावला जात नाही, दुरावला जात नाही. चुकून झालेही असेल तर चटकन माफी मागावी. कधी कधी आयुष्यातील घडलेल्या घटना आपल्या मनावर फार परिणाम करत असतात. अशा घटनांमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.म्हणून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे.

कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितेतून म्हणतात,

नाती जपण्यात मजा आहे

बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे

जुळलेले सूर गाण्यात मजा आहे

येतांना एकटे असलो तरी

सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

म्हणूनच मित्रांनो कशानेही आणि कधीही दुःखी होऊ नका. एकमेकांना भरभरून प्रेम द्या आणि आपले जीवन आनंदी बनवा.

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या