Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगयोग्य माणसांची साथ

योग्य माणसांची साथ

आपणा सर्वांनाच माहित आहे की जीवनात योग्य दिशा असेल किंवा योग्य दिशेने आपली वाटचाल चालू असेल तरच आपली मेहनत सफल होते. अन्यथा केलेल्या कष्टाचे चीज होत नाही. त्यासाठी काही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही. कितीही संकटे, अडचणी आल्या कुणी विरोध केला, अपमान केला, कोणी थट्टा, मस्करी केली, कोणी नावे ठेवली, कोणी अडवले, थांबवले किंवा पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला, काहीही झाले तरी हार मानायची नाही. मानसन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार हे सर्व सोडून द्यायचे फक्त आणि फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवायचे. ‘शेंडी तुटो वा पारंबी’ ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच. हे ध्येय गाठत असतांना प्रथम आपल्याला मार्गदर्शन मिळते ते आपल्या आई-वडिलांचे, गुरूंचे घरातल्या भाऊ- बहिणींचे, चुलत्या- काकांचे. कारण जीवनाला आकार देण्याचे काम, योग्य दिशा देण्याचे काम, चांगले संस्कार देण्याचे काम शाळेतच घडते. ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, गुरु आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, प्रगतीचा रस्ता दाखवतात. त्याचप्रमाणे मित्र, पुस्तके, ग्रंथ हे सुद्धा आपल्याला आयुष्यात चांगली वाट दाखवत असतात.

त्यांच्यामुळे आयुष्याला एक चांगली वाट सापडते. त्यांच्यामुळे आपल्या जगण्याला योग्य दिशा मिळते. त्यामुळे आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, आज पर्यंतच्या ज्या- ज्या थोर व्यक्ती झाल्या त्या इतरांच्या मार्गदर्शनामुळे, प्रेरणेमुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अठरा-अठरा तास वाचन करत होते. ज्यांनी आपल्या देशाला राज्यघटना दिली. ‘ग्रंथ हेच गुरु’ किंवा ‘पुस्तका सारखा मित्र नाही’ असे आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरे ही आहे. जी व्यक्ती ज्ञानाने समृद्ध आहे त्याला कुणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही. आपल्या सर्वांनाच माहित आहे चाणक्य. चाणक्याच्या राजनीतीने चंद्रगुप्त मौर्य गादीवर बसला आणि इतक्या वर्षांची परंपरा त्याने बदलून टाकली. म्हणून आयुष्यात चांगल्या व्यक्ती येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण चांगल्या व्यक्तींबरोबर केलेली मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, ठेचा पण अखेरपर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो. यासाठी आपले पूर्वज ही सांगतात की, व्यक्तीच्या जीवनात संतांचा सहवास देखील खूप महत्त्वाचा आहे. ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे आणि ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळते ती व्यक्ती नेहमीच उंच पदावर पोहोचते. आपल्याला पुरातन काळातील वाल्या कोळी ची गोष्ट माहित आहे. वाल्या हा खूप लोभी होता. त्याला अमाप पैसा, संपत्ती हवी होती. म्हणून तो रस्त्यावरील वाटसरूंना लुटायचा, दरोडे टाकायचा. प्रसंगी त्यांचा जीवही घ्यायचा. एकदा त्याच वाटेवरून नारदमुनी येत होते. त्यांनी नारद मुनींनाही लुटण्याचा विचार केला व त्यांच्याकडे जे काही आहे ते देण्यास सांगितले.

- Advertisement -

जीवनात योगाचे महत्त्व

परंतु नारदमुनी ने आपल्याकडे काहीही नसल्याचे सांगितले व त्याला म्हटले, तू हे जे पाप करतो आहे, ज्यांच्यासाठी करतो आहे ती तुझी बायको,पोरं तुझ्या पापात वाटेकरी आहेत का? तो म्हणाला हो. मग जेव्हा तो घरी गेला आणि आपल्या बायको, मुलांना विचारले तेंव्हा मात्र ते नाही म्हणाले. तो परत आला आणि त्याने नारदमुनींचे पाय धरले. तेंव्हा त्याला कळले की मी जे पाप करतोय त्याचा वाटेकरी मीच आहे. त्याचे हृदय परिवर्तन होते व तो वाल्याचा वाल्मिकी होतो. जो पुढे रामायणाचा रचियेता बनतो.म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनात योग्य मार्गदर्शकाची खूप गरज असते. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते व आपले जीवन समृद्ध करण्यास, बदलण्यास तेच प्रेरक ठरतात. द्रोणाचार्यांमुळे अर्जुन उत्कृष्ट धनुर्धारी झाला हे आपणास ज्ञात आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्यावर कालिदासाचा प्रभाव त्यांच्या पावसाळ्यातील कवितेतून झालेला दिसून येतो. राजा रविवर्मा हे उत्तम चित्रकार त्यांच्यावर थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव पडलेला दिसतो. आजही त्यांना आधुनिक भारतातील वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून ओळखले जाते. श्रीनिवास रामानुजन यांची प्रतिभा केंब्रिज युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर जी. एच.हार्डी यांनी ओळखली व त्यांनी त्याला ओळख व सन्मान मिळवून दिला. पुढे दोघांनी अनेक रिसर्च पेपर प्रकाशित केले. गांधीजींच्या मार्गदर्शनांनी प्रभावित होऊन रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. आर. के. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार पण त्यांच्या जडणघडणीत त्यांचे मोठे बंधू प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा मोलाचा वाटा होता.

गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या कुटुंबातील सगळेच बुद्धिबळ प्रेमी होते. त्यातल्या त्यात त्यांची आई. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला व वयाच्या पाचव्या वर्षापासून ते बुद्धिबळ खेळू लागले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळात आपलं स्थान निर्माण केलं. जॉन एफ केनेडी यांचे वडील जोसेफ पॅट्रिक यांनी जॉनला राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले व वयाच्या ४३ व्या वर्षी ते अमेरिकेचे ३५ वे राष्ट्रपती झाले. थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा दिवा, ग्रामोफोन इत्यादींचे शोध लावले. परंतु शाळेत ते फक्त तीन महिने गेले. शिक्षकांनी तो ‘ढ’ आहे असे सांगितले. तो काही शाळा शिकू शकणार नाही असा शिक्का मारला. पण एडिसनला आईने घडवले. सहा वर्षे तिने त्याला घरी शिकवले. हेलन केलर ज्या केवळ २९ महिन्यांच्या असताना तापाने फणफणल्या. तीन- चार दिवस ताप उतरला नाही. त्यावेळी त्यांची बोलण्याची व ऐकण्याची ताकद नष्ट झाली होती. त्यावेळी हेलनच्या आईने डॉक्टर माइकल अनेग्नाॅसशी भेट झाली. त्यांनी एक कुशल शिक्षिका एनी सलिवनला हेलनला मदत करण्यास पाठविले. एनीचे परिश्रम व हेलनची इच्छा यामुळे त्या वयाच्या १२ व्या वर्षी बोलू लागल्या. त्या पाच भाषा शिकल्या. हेलनने ब्रेन लिपीतअनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी जगातील मुक्यांना वाणी व अंधांना प्रकाश दिला. अशा प्रकारे आपल्याला असे अनेक उदाहरणे सांगता येतील. जीवनात योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ ही आयुष्याची कधीही पीछेहाट होऊ देत नाही. आज प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्ती पाहिल्यानंतर त्याच्या जीवनात अशीच मार्गदर्शक ग्रंथ, पुस्तके, व्यक्ती आल्या आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य सुकर झाले.व यशस्वीरित्या ते आपले जीवन जगले. म्हणूनच जीवनात योग्य व्यक्तींची साथ मिळणे खूप महत्त्वाचे आहे.एकदा आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं की आयुष्यही तितकेच मनमोहक, सुंदर दिसायला लागते. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढत जाते.

माझे काय चुकले…

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या