मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) मिरा-भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) आज (मंगळवारी) काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी (Police) परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून (Balaji Hotel) या मोर्चाला सुरुवात होणार होती. या मोर्चापूर्वी मनसे आणि ठाकरे गटाच्या (MNS Shivsena UBT) पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या जात होत्या. त्यानंतर आज पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचे पोलिसांनी घर गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सध्या काशिमिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तर अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे (Datta Shinde) यांनी मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई, ठाणे भागात परप्रांतीय नागरिकांना मारहाण होत आहे. काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर परिसरात एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासह अन्य प्रकाराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून प्रति मोर्चा काढण्याचे नियोजन केले जात होते. पोलिसांनी मात्र या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा मोर्चा झाला त्याला भाजपने निधी दिला पण मराठी माणसाने ठरवलं आपण मोर्चा काढावा तर मनसेचे नेते कार्यकर्ते यांना पकडण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. मराठी भाषेसाठी मोर्चा काढणाऱ्यांना आधी उचललं जातं आहे. मराठी भाषेचा अपमान मराठी माणसं करणार नाही. हिंदी सक्ती केली जाते त्यासाठी सगळे एकत्र आलेत. हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढत होता पण बिहार निवडणुकीचा हा मुद्दा त्यांनी केला आहे. मुंबई निवडणुकीसाठी (Mumbai NMC) देखील त्यांना हा मुद्दा होऊ शकतो. ही भाजपची (BJP) दुटप्पी भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले आहे.




