Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगवाचन - जगण्याची देते दृष्टी

वाचन – जगण्याची देते दृष्टी

आपल्या सर्वांनाच माहित आहे की वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. जगात काय चालले आहे याची माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली विचार करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे आपण वर्तमानपत्र, गोष्टीची पुस्तके, ग्रंथ, साप्ताहिके, मासिके, कादंबऱ्या इत्यादी अनेक गोष्टींचे वाचन केले पाहिजे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते आणि आपला विकास होतो. वाचनाने अनेक नवनवीन शब्दांची ओळख होते. संवाद कौशल्य सुधारते. वाचनामुळे मन तरुण, निरोगी व कुशाग्र होण्यास मदत होते. सतत वाचनामुळे आपले ज्ञान तर वाढतेच पण आपण स्मार्ट बनतो. फ्रांन्सिस बेकन हे इंग्रजी लेखक म्हणतात, वाचन परिपूर्ण माणूस बनवतो. त्यामुळे सतत चांगली- चांगली पुस्तके वाचली पाहिजे. चांगली पुस्तके वाचल्याने मनावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि आयुष्यात ते विचार आपणास योग्य दिशेने नेत असतात.

वाचनाच्या सवयीमुळे आपण एक चांगली व जबाबदार व्यक्ती बनतो. ज्या वेळेला आपण एखादे पुस्तक वाचतो त्यावेळेस आपल्याला त्या विषयाची सखोल माहिती प्राप्त होत असते. त्यातून बरेच काही आपणास शिकायला मिळते. वाचनामुळे भाषेची कौशल्य आणि शब्दसंग्रह विकसित होत जातात. मन एकाग्र होते व नेहमी प्रसन्न राहते. पुस्तकांशी मैत्री केली की वाचनाची आवड वृद्धिंगत होते. कधीही आपणास एकटेपणा जाणवत नाही व मनाचे मनोरंजन होते. मनाला शांती मिळते, आनंद मिळतो. भाषा सर्जनशील पणे कशी वापरावी हे शिकण्यास मदत होते. वाचन जीवनाकडे गंभीरपणे बघायला व अंतर्मुख व्हायला शिकवते. वाचन हा आपल्या मनाच्या आरोग्याचा व्यायाम आहे. त्यामुळे आपले भावनिक आरोग्य सुधारते. पुस्तके वाचणे हा तणाव कमी करण्याचा एक मार्ग आहे. वाचनामुळे सर्जनशीलता वाढते, समज वाढतो व त्यातून आपणास लिहिण्याची प्रेरणा मिळते. नवनवीन विचार सुचतात जे जीवन जगण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात. वाईट विचार कधी मनात येत नाही. मनुष्या जवळ असणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे ज्ञान आहे. जीवनात ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाची सवय असणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी, यश मिळवण्यासाठी वाचनाची फार आवश्यकता आहे. त्यामुळेच मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकतो.ज्ञानाचा उपयोग जीवनात प्रत्येक क्षणाला होत असतो. वाचण्याची सवय असणाऱ्या लोकांमध्ये उच्च बुद्धिमत्ता असलेली दिसून येते. समाजात सर्वांशी चांगले संबंध निर्माण होतात. वाचनामुळे सतत प्रेरणा मिळत असते. थोर व्यक्तींचे चरित्र वाचल्याने ध्येय साध्य करण्यासाठी व कठोर परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. देशाचा एक चांगला नागरिक बनण्यास मदत होते. ज्याप्रमाणे शरीराची भूक अन्नाने भागते त्याप्रमाणे मेंदूची भुक वाचनाने भागते. पुस्तक हे चांगले मित्र तर आहेच पण ते उत्तम शिक्षक देखील आहे. ते नेहमी नवीन चांगला दृष्टिकोन देत असतात. वाचनामुळे मन सक्रिय व मजबूत बनते. वाचनामुळे वाईट गोष्टी विसरल्या जाऊन मन प्रसन्न राहते. नवीन कल्पना सुचतात. जीवनात प्रगती करायची असेल,विकास साधायचा असेल तर वाचनाची सवय असणे फार आवश्यक आहे. वाचनामुळे मनुष्य ताणतणाव मुक्त होतो. आपल्याला चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते. मुलांचा सर्वांगीण विकास साधता येतो. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश देखील लक्षात घ्यायला हवा. वाचनामुळे स्मरणशक्ती सुधारते.

पुस्तक वाचनाने ज्ञान मिळते. त्यात वाढ होते व नेहमी आपल्याला ते प्रेरित करत राहते. त्यामुळे वाचनाची सवय ही एक चांगली सवय आहे. आपण सर्वांनी ती अंगीकारली पाहिजे. वाचनाने मनाचा विस्तार होतो व नवनवीन विचार कौशल्य व विश्लेषणात्मक क्षमता सुधारतात. वाचन हे नेहमी शरीर व मनास उर्जा देते. वाचनामुळे भाषेवर प्रभुत्व प्राप्त करता येते. वाचन ही एक कला आहे जी माणसाला माणूस बनवते. आपल्या जीवनाला दिशा देते. चांगल्या वाईटाची जाणीव करून देते. वाचन माहितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यास शिकविते आणि ती ज्ञानाची तहान वाढवते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो. आजच्या काळात आनंदी व मनासारखे जगायचे असेल तर वाचनाचा छंद असायलाच हवा. वाचनामुळे आपले जीवन बदलण्यास मदत होवू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

वाचनाने होते समृद्ध मन

माहिती मिळते ज्ञानात भर

व्यक्तिमत्व विकासासाठी

मानवा नित् वाचन कर

थोर व्यक्तींचे चरित्र

देई जगण्यास बळ

वाचनाने येई एकाग्रता

मिळे चांगल्या कामाचे फळ

भावभावनांचा मेळ

सुचे नवनवीन विचार

जीवन होईल यशस्वी

कष्ट कर तू अपार

पुस्तक मित्र,गुरु खरा

होई प्रसन्न मन

बनवी ज्ञानाने मजबूत

देई नवे दृष्टीकोन

_मलेका शेख- सैय्यद

(लेखिका मलेका महेबूब शेख-सैय्यद यांनी मराठी, राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर अभ्यास केला असून शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचे मानसमेघ, अमन, आयाम हे काव्यसंग्रह व उमेद हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला आहे. लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार, वूमन ऑफ द इयर पुरस्कार, लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मानाने त्यांचा गौरव झाला आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या