Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमराठवाड्यात 'कोसळधार'; नद्यांना पूर, बांध फुटले, जमिनी खरडल्या, २ जणांचा मृत्यू, जनावरे...

मराठवाड्यात ‘कोसळधार’; नद्यांना पूर, बांध फुटले, जमिनी खरडल्या, २ जणांचा मृत्यू, जनावरे दगावली

मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या आठवड्यात उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या ४८ तासापासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यात पावसाने जरी दडी मारली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र याच पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांममध्ये अतिवृष्टी झाली आहे. हिंगोली, यवतमाळ, वाशिम, परभणी, नांदेडला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

नांदेड, लातून, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने दाणादाण केलीय. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती आल्याची माहिती मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पळालाय, कारण शेतपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येतेय.

मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. गेल्या २४ तासात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, लातूरमध्ये पुरात एक जण वाहून गेला असून ७८ जनावरे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यात दोन जण दगावले आहेत. १०६ कच्च्या घरांची पडझड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा धुमाकुळ
मराठवाड्यात पावसाने कहर केला असून मागील २४ तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळांपैकी २४० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने दाणादाण उडाली आहे.

मराठवाड्यात रविवारपासून मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे तुडुंब भरुन वाहत आहे. अनेक शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेय. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांची पडझड झाली आहे. बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सखल भागात पाणी हळूहळू शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुरात बस वाहुन गेली
मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक गावात पाथरी आगाराची मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बसमध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते. बस मध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालू झाली नाहीय.. काही वेळेतच बस पुराच्या पाण्यातून वाहून गेली.. चालकांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी घेतल्यानं त्यांचे प्राण वाचलेत.

जालन्यातील परतूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओढे पुराच्या पाण्याने दुथडी भरुन वाहत आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात ही पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला आहे. जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या भागातील सर्वाधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शेती शिवारात शिरले आहे. शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

बीड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.परळी महामार्गावर असणारा तात्पुरता पूल वाहून गेलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या