अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यंदाच्या निवडणुकीत दुबार मतदानाला आळा बसावा, यासाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पारंपरिक शाईऐवजी यावेळी मतदारांच्या बोटावर खास मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व 503 मतदान केंद्रांसाठी 1 हजार 473 मार्कर पेन निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिले आहेत.
निवडणुकीत चिन्हवाटपानंतर उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून सर्व प्रभागात वातावरण तापले आहे. आज (शनिवार) व उद्या (रविवार) दोन दिवस प्रचार करता येणार आहे. दुसरीकडे प्रशासनाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. 12 पालिकांसाठी उभारण्यात येणार्या 503 मतदान केंद्रांवर 564 कंट्रोल युनिट आणि 1 हजार 146 बॅलेट युनिट बसविण्यात येणार आहेत.
कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मतदानयंत्रे वाटप होण्यापूर्वी दुसर्या टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत एकूण 289 जागांसाठी मतदान होणार आहे. थेट जनतेतून 12 नगराध्यक्षांची निवड होणार असून नगराध्यक्षपदासाठी 110 उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी 1 हजार 371 उमेदवार निवडणूक लढवत असून, 152 प्रभागांतील 4 लाख 51 हजार 262 मतदार आपला कर्तव्यनिवृत्तीचा हक्क बजावतील.
पालिका निवडणुकीत प्रथमच लागू होणार्या मार्कर पेनच्या वापरामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या तयारीसह सर्वांची नजर आता 2 डिसेंबरच्या मतदानाकडे लागली आहे.





