Friday, May 3, 2024
Homeनगरबाजार समितीच्या सभापती-उपसभापती यांच्यात जुंपली

बाजार समितीच्या सभापती-उपसभापती यांच्यात जुंपली

राजकीय हेव्यादाव्या पायी गाव विकासापासून वंचित – सभापती नवले

बेलापूर |वार्ताहर|Belapur

बेलापूर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापतिपद तसेच सचिव पदही मिळालेले आहे. गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही मंडळी विकासकामात खोडा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गावातील व्यापारी व शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार बाजार समितीच्या पहिल्याच बैठकीत बेलापूर उपबाजार समितीच्या आवारातील काँक्रिटीकरणाची मंजुरी घेतली. तसेच मुख्य बाजार समिती श्रीरामपूर व उपबाजार समिती टाकळीभान येथील कामाचेही प्रस्ताव पणन संचालक यांच्याकडे मंजुरीसाठी तयार केलेले आहेत. मात्र, बाजार समितीचे उपसभापती व बेलापूर गावाचे उपसरपंच अभिषेक खंडागळे हे केवळ राजकीय ताकदीचा वापर करून तसेच दबाव तंत्राचा अवलंब करून विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अन्य दोन संचालक नानासाहेब पवार व सुनील शिंदे यांच्या स्वाक्षरी घेऊन पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, असे म्हटले आहे.

खरे तर गावाच्या विकासात राजकीय जोडे बाजुला ठेवून एकदिलाने काम करणे अपेक्षित होते. परंतु, केवळ मोठमोठी भाषणबाजी करायची अन् लोकांची दिशाभूल करायची ही यांच्या कामाची पध्दत आहे. हे गावाला जॉगिंग ट्रॅकच्या कामातून माहीत झाले आहे. जॉगिंग ट्रकच्या फार मोठा गवगवा झाला, मोठ्या प्रमाणात निधीही खर्च झाला, अन त्या जॉगिंग ट्रॅकचा ‘जोकींग ट्रॅक’ झाला. आपण बोगस व चुकीची कामे करायची अन दुसर्‍याच्या कामात तंगडी अडवायची! ही यांची पद्धत आहे. यांच्या ‘ओठात एक अन पोटात एक’ आहे. केवळ राजकीय कावीळ झाल्याने त्यांच्या असणार्‍या महाभागाच्या सांगण्यावरुनच विकास कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही नवले यांनी म्हटले आहे.

विकास कामांना नाही तर मनमानी कारभाराला विरोध – उपसभापती खंडागळे

बेलापूर |वार्ताहर| Belapur

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने योग्य पध्दतीने करण्यात येणार्‍या विकास कामांना आपला विरोध नाही. चुकीच्या व हुकूमशाही पध्दतीने होणार्‍या कारभाराला विरोध आहे व राहील. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विखे गटाच्या सर्व संचालकांच्या साथीने बाजार समितीत शेतकरी, सभासद, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या हितरक्षणाचे काम यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रीया उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.

सभापती सुधीर नवले यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना श्री. खंडागळे म्हणाले, बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथे शेतकरी व व्यापार्‍यांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था होण्यासाठी कॅन्टीन पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. व्यापारी शेड हॉलची दुरुस्ती देखील आवश्यक आहे. अशा काही मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना स्वतःच्या फायद्यासाठी मलाईदार कामे हाती घेतली जात आहेत. एकाच मिटींगमध्ये 16-17 मलाईदार विषय बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता मंजूर करून घेतले जातात. याची घाई कशासाठी असा प्रश्न पडतो. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने येणार्‍या काळात संस्थेचे उत्पन्न कमी होणार आहे. याआधी संस्थेने विकास कामांसाठी शासनाकडून कर्ज घेतलेले आहे, ते कर्ज अद्याप फिटलेले नसताना पुन्हा कर्ज काढून विकास कामे केली जाणार आहेत. याचा बोजा शेतकरी, सभासद, व्यापारी यांच्यावरच पडणार आहे. मग रीन काढून सण कशाला? अशी परिस्थिती असताना हुकूमशाही पध्दतीने होत असलेल्या चुकीच्या कामकाजाला आपला कायम विरोध असणार आहे.

सभापती-उपसभापती बेलापूर गावचे आहेत, याची उपरती आजच कशी झाली? उपसभापतीला तीन महिने तुटक्या खुर्चीवर बसवले तेव्हा उपसभापती गावातीलच आहे याचे भान राहिले नव्हते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ उपसभापती विरोधी गटाचे आहेत, यामुळेच राजकीय सूडबुद्धीने उपसभापतींना वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही श्री. खंडागळे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या