Wednesday, January 7, 2026
Homeनगरसावधान… मुलांच्या लग्नाच्या अमिषाने अनेकांची फसवणूक

सावधान… मुलांच्या लग्नाच्या अमिषाने अनेकांची फसवणूक

राहुरी तालुक्यातही सुरू झाला बोगस ‘लग्नगुंड’ कारभार

उंबरे | Umbare

राहुरी तालुक्यात सध्या लग्न जुळवणार्‍या ‘वधू-वर सुचक केंद्र’ या नावाखाली सुरू असलेली फसवणुकीची मालिका चिंतेचा विषय बनली आहे. तसेच अनेक सोयरिक दलालांचाही सुळसुळाट झाला आहे. मुलांची लग्न होत नाहीत या भीतीने अनेक पालक चिंतेत असतात. आजही अनेक पालक माझ्या मुलाचं लग्न झालं की झालं या मानसिकतेत आहेत. पण लग्न ही फक्त एक सोहळा नसून आयुष्याचा पाया असतो. फसवणूक, खोटी ओळख आणि पैशांच्या आमिषावर उभे असलेले लग्न कधीच टिकत नाही.

- Advertisement -

मुलाच्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नसतं. मग फसवणूक करून लग्न लावण्याची घाई का? या परिस्थितीचा फायदा घेत काही दलाल आता बाहेरून शिकलेल्या किंवा गरीबाच्या मुली आणतो, तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो असे आश्वासन देत निरपराध कुटुंबांना आर्थिक व मानसिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहेत. यामध्ये अनेक पालकांची फसवणूकही झाली आहे. 25 ते 35 वयोगटातील अनेक मुलांचे विवाह अद्याप न झाल्याने, त्यांच्या पालकांकडून दलालांना लग्न जमवण्याचे काम दिले जाते. हे दलाल सुरुवातीला मुलगी पाहण्यासाठी 10 हजार रुपये मागतात. त्यानंतर बनावट पत्त्यावर, भाड्याच्या घरात राहणार्‍या मुली दाखवून पालकांची दिशाभूल केली जाते. या मुलींची ओळख पटवण्यासाठी बनावट आधारकार्ड वापरले जात असल्याचेही उघड झाले आहे.

YouTube video player

बोलणी ठरल्यावर मुलाकडून मुलीच्या घरच्यांना 4 ते 5 लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली जाते. लग्नाआधी अर्धी रक्कम आणि लग्नाच्या दिवशी उरलेली रक्कम दिली जाते, यातील सुमारे 1 लाख रुपये दलालाकडे जातात.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलींची एका मागोमाग पाच ते सहा ठिकाणी लग्न लावून देण्यात आली आहेत. लग्न झाल्यानंतर रात्रीच या मुली घरातील दागदागिने घेऊन पसार होतात.

बहुतेक प्रकरणात पूर्वनियोजित गाडी घराबाहेर तयार असते. रात्री बारा ते एकच्या दरम्यान मुलगी आणि तिच्यासोबत आलेली महिला घर सोडून पळतात. सकाळी उठल्यानंतर नवरी गायब झाल्याचे लक्षात येते. घरच्यांनी दलालाशी संपर्क साधल्यावर तो मात्र हात झटकतो. माझं काम लग्न लावून देण्यापर्यंतच होतं अशी सपशेल प्रतिक्रिया देतो. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाली आहेत. फसवणूक झालेल्या पालकांकडून पोलीस विभागाने तातडीने गुप्त पथक तयार करून या दलालांवर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अनेक गावांत या दलालांची माहिती गावातील लोकांकडे असून, त्यांनी पुढे येऊन पोलिसांना ती देणे ही समाजाची जबाबदारी आहे.

सावध राहण्याचे पालकांना आवाहन
मुलाचं लग्न उशिरा झालं तरी चालेल, पण फसव्या लग्नमांडवात मुलाचं आयुष्य अडकू नये. पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज आहे. मुलाचं लग्न व्हावं म्हणून काहीही करा या मानसिकतेचा फायदा हे फसवे दलाल घेत आहेत. त्यामुळे पालकांनी आता तरी जागे व्हावे, आपल्या मुलांना व्यवसायात किंवा आत्मनिर्भरतेकडे वळवावे, आणि अशा फसव्या दलालांपासून सावध राहावे.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...