अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मुळ गणेशवाडी (ता. नेवासा) येथील व सध्या केडगाव (अहिल्यानगर) येथे राहत असलेल्या पीडित 32 वर्षीय विवाहितेने गुरूवारी (25 सप्टेंबर) सायंकाळी फिर्याद दिली.
पती बाळासाहेब दत्तात्रय तांदळे, सासु अल्का बाळासाहेब तांदळे, सासरे दत्तात्रय शंकर तांदळे, दीर शेख बाळासाहेब तांदळे, चुलत दीर कैलास तांदळे (सर्व रा. गणेशवाडी, ता. नेवासा) तसेच नणंद स्वाती सोमनाथ पालवे (रा. उदरमल, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना फिर्यादीचे लग्न झाल्यापासून वेळोवेळी तसेच 30 नोव्हेंबर 2024 रोजी, 13 डिसेंबर 2024 रोजी घडली आहे.
पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहानंतर वेळोवेळी पतीसह सासरच्यांनी सतत मानसिक व शारीरिक छळ केला. शिवीगाळ केली, दमदाटी केली तसेच शेती खरेदीसाठी पैसे आणण्याची मागणी केली. यासोबतच कष्टाची कामे करून घेत छळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, पीडिताने यासंदर्भात सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अंमलदार तारडे अधिक तपास करीत आहेत.




