अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे विवाहितेने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कावेरी दशरथ काळे ऊर्फ कावेरी गणेश डोंगरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिच्या सासरच्या लोकांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावेरीचे वडिल दशरथ अशोक काळे (वय 35 रा. राहुरी खुर्द ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. कावेरीचा पती गणेश भारत उर्फ बाळू डोंगरे, सासू रंजना भारत उर्फ बाळू डोंगरे, सासरे भारत उर्फ बाळू बापुराव डोंगरे (सर्व रा. डोंगरे वस्ती, वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीची मुलगी कावेरीचा विवाह गणेश भारत उर्फ बाळू डोंगरे याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर कावेरी हिच्यावर टेम्पोचे लोन फेडण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणण्याची जबरदस्ती केली जात होती. पैसे आणले नाहीत, म्हणून सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. पती गणेश डोंगरे, सासू रजना डोंगरे आणि सासरे भारत डोंगरे यांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून छळले. या सततच्या छळाला कंटाळून कावेरी हिने 2 मार्च 2025 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.