अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नात मानपान केला नाही आणि घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणले नाहीत, या कारणावरून 26 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पती संकेत ज्ञानदेव फुलसौंदर, सासरे ज्ञानदेव यादव फुलसौंदर, सासू अलका ज्ञानदेव फुलसौंदर व दीर शुभम ज्ञानदेव फुलसौंदर (सर्व रा. यशोदानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह 31 जानेवारी 2023 रोजी संकेत सोबत झाला होता. लग्नानंतर सुरूवातीचे आठ-पंधरा दिवस सासरच्यांनी फिर्यादीला चांगले नांदवले. मात्र, त्यानंतर तुझ्या आई-बापाने लग्नात आमचा मानपान केला नाही, त्यामुळे नातेवाईकांनी आम्हाला नावे ठेवली, असे म्हणत सासू अलका, सासरे ज्ञानदेव, पती संकेत आणि दीर शुभम यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
फेब्रुवारी 2023 मध्ये फिर्यादी आजारी असताना उपचारासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचबरोबर, आम्हाला घर बांधायचे आहे, त्यासाठी तुझ्या माहेरहून पाच लाख रूपये आण, नाहीतर तुला जिवंत मारून टाकू, अशी धमकी देत सासरच्यांनी पैशांसाठी तगादा लावला. फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत हा छळ सुरू होता. अखेर त्रास असह्य झाल्याने फिर्यादीने भरोसा सेलमध्ये तक्रार केली होती. तेथून पत्र मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (7 नोव्हेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




