अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुणे येथे सलून व्यवसायासाठी नवीन दुकान खरेदी करण्यासाठी माहेरून 25 लाख रूपये घेऊन ये, या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावेडी उपनगरात राहणार्या पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती संभाजी शिवाजी तोडकर, सासू छाया शिवाजी तोडकर, सासरे शिवाजी तुकाराम तोडकर आणि नणंद तेजस्विनी अक्षय लोखंडे (सर्व रा. मुडशिंगी, ता. जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे पती संभाजी तोडकर यांचा पुण्यात सलून व्यवसाय आहे. व्यवसायात अडचण असल्याचे सांगून पतीने फिर्यादीचे 10 तोळे सोन्याचे दागिने व सुमारे 15 लाख रूपये घेतले होते. त्यानंतरही ‘तू माहेरून नवीन दुकानासाठी 25 लाख रूपये घेऊन ये’, असे म्हणत सासरच्यांनी फिर्यादीचा छळ सुरू केला.
पतीने मद्यपान करून मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार केले. तसेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री मारहाण करून त्यांना घरातून हाकलून दिले. फिर्यादीने आई-वडिलांकडे येत येथील भरोसा सेलकडे तक्रार केली होती. दरम्यान, भरोसा सेलमध्ये समझोता न झाल्याने अखेर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर पीडिताने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.




