Tuesday, January 6, 2026
Homeनगरपांढरीपूल घाटात १० ते १२ तासांचा ब्लॉक

पांढरीपूल घाटात १० ते १२ तासांचा ब्लॉक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अगोदरच झालेली दुरवस्था त्यातच नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आल्याचा निर्णय सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी शुक्रवार (दि.१०) रोजी पहाटे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या मार्गावरील काही वाहतूक वांबोरी तर काही पाथर्डीच्या कोल्हार घाटातून मार्गस्थ करण्यात आली.

- Advertisement -

शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मार्गावर ट्रक व चार खाजगी बस यांचा विचित्र अपघात इमामपूर घाटात झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या ठिकाणी पाच वाहनांचा अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. एमआयडीसी पोलीस तसेच महामार्ग पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत होती. ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अस्ताव्यस्तपणे वाहन चालकांनी वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक सुरळीत करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती.

YouTube video player

छत्रपती संभाजी नगर महामार्गाची दयनीय अवस्था झाली असतानाही मनमाड महामार्गावरील वाहतूक २० ऑक्टोबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आली आहे. मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे अवजड वाहने व इतर वाहनांची मोठी वर्दळ छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाहावयास मिळते. महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडलेले असून रस्त्याची चाळण झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक वैतागले होते. त्यातच अधिक भर मनमाड महामार्गावरील वाहतुकीची पडली आहे.

इमामपूर घाटात वाहतूक ठप्प झाल्याने जेऊर ते घोडेगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पांढरीपुल येथील चौकातून वाहने वांबोरी मार्गे तसेच कोल्हार घाटातून वळविण्यात आली होती. तसेच अहिल्यानगर कडून जाणारी वाहने वांबोरी फाट्यावरून डोंगरगण मार्गे तसेच बहिरवाडी, कोल्हार घाट, चापेवाडी, गवारे वस्ती परिसरातून जात होती. पर्यायी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असती तर महामार्गावर खूपच विदारक चित्र पहावयास मिळाले असते. दरम्यान, यावेळी वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाहने अडकली होती. एसटी बसेस, खाजगी बसेस याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची वाहने अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताच आले नाही. महामार्ग दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करून देखील त्याकडे गांभीर्याने न पाहता उलट मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वळविण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप महामार्गालगतचे ग्रामस्थ करत आहेत.

महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून प्रशासनाने या बाबीचा विचार करण्याची गरज आहे. मनमाड महामार्गावरील वाहतूक वळविल्याने नागरिकांमधून संताप देखील व्यक्त केला जात आहे. महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे, धुळीचे साम्राज्य, अपघात अन् वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी, निवेदन, आंदोलन करून देखील प्रशासनावर काहीही परिणाम झालेला नाही. आमचे हात टेकले आहेत. त्यामुळे आता यापुढे प्रशासनाकडे आमची काहीही मागणी नाही. काय निर्णय घ्यायचा तो प्रशासनाने घ्यावा. अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ हारेर यांनी दिली.

ताज्या बातम्या