Friday, January 23, 2026
Homeनगरकारल्याच्या शेतात गांजाची लागवड, तब्बल ११२ किलो वजनाचा ११ लाखांचा गांजा जप्त

कारल्याच्या शेतात गांजाची लागवड, तब्बल ११२ किलो वजनाचा ११ लाखांचा गांजा जप्त

पारनेर । तालुका प्रतिनिधी

सुपा पोलिसांनी नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात मोठी कारवाई करत ११ लाख २० हजार रुपये किमतीचा तब्बल ११२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती ज्योती गडकरी यांनी पथकासह ही कारवाई केली.

- Advertisement -

११ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस ठाण्यातील पोहेकॉ मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहाजापुर शिवारातील भाऊसाहेब सोनबा शिंदे हे त्यांच्या पिंपळगाव कौडा (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथील गट क्रमांक १५५ मधील शेतात अवैध गांजाची लागवड करत आहेत. ही माहिती खात्रीलायक वाटल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाईची तयारी केली. श्रीमती गडकरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान कारल्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लपवून ठेवलेली आढळली. पोलिसांनी तातडीने झाडे जप्त केली असता त्याचे एकूण वजन ११२ किलो असल्याचे निष्पन्न झाले. या हिरव्या रंगाच्या ओलसर झाडांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ११ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

YouTube video player

या प्रकरणात भाऊसाहेब सोनबा शिंदे (वय ५९, रा. शहाजापुर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या विरोधात बेकायदा गुंगीकारक औषधी आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(अ), २०(ब)(२)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), वैभव कलबुर्मे (अप्पर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) आणि शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी, पोसई मंगेश नागरगोजे, चालक सफौ इथापे, पोहेकॉ मरकड, पोकॉ सातपुते, पोकॉ गायकवाड, पोकॉ कोल्हे, मपोकॉ आढाव आणि शासकीय पंच यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुपा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...