अहिल्यानगर (प्रतिनिधी)
हुबेहूब 500 रूपयांच्या भारतीय चलनी नोटांसारख्या बनावट नोटा छापणार्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती. यात आणखी पाच जणांना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून 59 लाख 50 हजार रूपयांच्या बनावट नोटा, 2 कोटी 16 लाख रूपये किंमतीचे कच्चा माल आणि अत्याधुनिक छपाई साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कालुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते उपस्थित होते. 27 जुलै रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना माहिती मिळाली की, दोन इसम काळ्या रंगाच्या वाहनातून आंबीलवाडी परिसरात फिरत आहेत आणि 500 रूपयांच्या बनावट नोटा वापरून सिगारेट खरेदी करत आहेत. पोलिसांनी सापळा रचून निखील शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कोंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनातून 80 हजार रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथून आणखी संशयित आरोपींचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी प्रदीप संजय कापरे (वय 28, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय 40, रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (वय 53, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय 27, रा. निर्सग कॉलनी, पेठेनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल सुधाकर पवार (वय 34, रा. मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल अधीक्षक घार्गे यांनी तपास पथकाचे अभिनंदन करत 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोलीस अंमलदार सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडु शिंदे, सागर मिसाळ, राजु खेडकर, विक्रांत भालसिंग, अदिनाथ शिरसाठ, अन्सार शेख, मोहिनी कर्डक व मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
वाळुंज एमआयडीसीतील घरात छापखाना
चौकशीदरम्यान संशयित आरोपींनी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळुंज एमआयडीसी परिसरात एक घर भाड्याने घेतल्याची कबुली दिली. त्या ठिकाणी बनावट नोटा छापण्याचा संपूर्ण सेटअप उभारण्यात आला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकून 59 लाख 50 हजार रूपयांच्या बनावट नोटा, तसेच 2 कोटी 16 लाख रूपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी आवश्यक कागद, शाई, संगणक, अत्याधुनिक छपाई मशिन असा एकूण 88 लाख 20 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
खर्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा
छापखाना सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या हाती एक डायरी लागली आहे. त्या डायरीमध्ये सन 2021 पासूनच्या नोंदी आढळून आल्या आहेत. यामुळे बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना 2021 पासून सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय चलनातील खर्या नोटा घेऊन त्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींकडे अजून कसून चौकशी केली जात आहे. बनावट नोटा मार्केटमध्ये कशा पध्दतीने आणल्या जात होत्या, याची माहिती घेतली जात आहे.
बँकांना सावधगिरीच्या सूचना
या बनावट नोटा इतक्या हुबेहूब आहेत की त्या सर्वसामान्यांच्या लगेच लक्षात येण्यासारख्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांना पत्र पाठवून जर अशा नोटा बँकेत आल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.





