मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी डोंबिवली (Dombivli) एमआयडीसीमधील (MIDC) एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटांमुळे कारखान्याला मोठी आग लागली असून या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स (Indo Amines) या कंपनीत
ही भीषण आग लागली असून अनेक स्फोटांचे आवाज येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या कारखान्यात (Factory) मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, सकाळी कारखान्याच्या आसपास मजूर दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना धुरामुळे व स्फोट होत असल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले असून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे.