कोपरगाव (तालुका प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या पुणतांबा चौफुली परिसरात सोमवारी दोन ते तीन तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्याचे सुरू असलेले काम आणि लग्नसराईमुळे वाढलेली वाहनांची संख्या यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये देखील कोणताही पोलीस बंदोबस्त अथवा वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने कोपरगाव शहर आणि परिसरातून विविध दिशांना जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच दरम्यान पुणतांबा चौफुली परिसरात रस्त्याचे कामही सुरू असल्याने अरुंद झालेल्या मार्गावरून वाहने हळूहळू पुढे सरकत होती. परिणामी, महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने अडकली.
या वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात जाणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांसह रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला. वेळेवर पोहोचण्याच्या घाईत असलेल्यांना मोठी अडचण निर्माण झाली. काही ठिकाणी नागरिकांनी आपल्या वाहनातून उतरून रस्त्यावरच मदत करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस बंदोबस्ताच्या अभावामुळे परिस्थिती सुधारली नाही.
“रस्त्याचे काम सुरू ठेवणे योग्य आहे, पण त्याचबरोबर पर्यायी मार्गाची व्यवस्था किंवा वाहतूक पोलीस तैनात करणे आवश्यक होते. आता दोन तास या ठिकाणी अडकून बसावे लागत आहे,” अशी प्रतिक्रिया एका वाहनधारकाने दिली. वाहतूक कोंडी ही केवळ गैरसोयीची बाब नसून आपत्कालीन परिस्थितीत मोठा अडथळा ठरू शकते. प्रशासनाने यापुढे अशा वेळांना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी वेळेवर सेवा मिळावी यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि पोलिसांची सक्रिय भूमिका महत्त्वाची आहे.