अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
धो-धो पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यात जिल्ह्यातील दक्षिण भागातील नद्यांना पूर आला आहे. नगर शहरात सीना नदी, तालुक्यात मेहकरी नदी, श्रीगोंदे तालुक्यात कोळगावच्या पळसा नदी, बेलवंडीमधील नदी, श्रीगोंद्यातील सरस्वती नदी व आढळगावमधील देव नदी, तर कर्जत तालुक्यात कर्जतमधील भोरर्डी नदी व लेंडी नदी, तसेच भांबोरामधील लोहकर नदी या नद्या मे महिन्यात दुथडी भरून वाहत आहेत.
दरम्यान, मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने उच्चांक गाठला आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हाचा अनुभव नगरकरांनी घेतला. आता अतिमुसळधार पावसाचा अनुभव अहिल्यानगरकरांनी घेतांना दिसत आहेत. 12 मेपासून सुरू झालेल्या या मान्सूनपूर्व पावसाने अवघ्या 16 दिवसांत 201.2 मिलीमीटरची नोंद केली आहे. आजपर्यंत 201.2 मिलीमीटर पाऊस झाला असून अजूनही धो-धो पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी, नाले व ओढ्यांना पाणी तर आलेच, पण रस्त्यांवर नदी वाहत होती.
मान्सूनपूर्व पावसाला जिल्ह्यात तशी सुरुवात 9 मेपासून झाली. परंतु तुरळक पाऊस झाला. 12 मेपासून काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दररोज कोठे ना कोठे या पावसाने हजेरी लावली. मात्र 29 मेपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच कहर केला. त्यात नगर दक्षिण भागातील तालुके या पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यात अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व राहुरी या पाच तालुक्यातील बहुतांशी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. उत्तर नगर जिल्ह्यात काही तालुक्यात जोराचा तर काही तालुक्यात तुरळक पावसाची नोंद झाली. मात्र नगर दक्षिणमधील अहिल्यानगर शहर, तालुका, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, राहुरी या तालुक्यात दमदार पाऊस झाला.
जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील पावसाची सरासरी 448.1 मिलीमीटर आहे, तर जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांची सरासरी 516.5 मिलीमीटर आहे. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सरासरीपेक्षा 131.48 टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे, म्हणजे 679.1 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. मात्र यंदा मे महिन्यात अवघ्या 16 दिवसांमध्येच मान्सूनपूर्व पावसाने 201 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दि. 26 मेपर्यंत हा पाऊस झाला असून अजनूही पुढचे चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व पावसाने नवा विक्रम केला आहे. सर्वाधिक पाऊस श्रीगोंद्यात 335 मिलीमीटर, तर सर्वात कमी कोपरगावमध्ये 63 मिलीमीटर झाला आहे.
पावसाची सरासरी व मे महिन्यात झालेला पाऊस
नगर 551.9 (241.7), पारनेर 478.8 (278.1), श्रीगोंदा 483.2 (335.8), कर्जत 524.5 (334.2), जामखेड 643.5 (261.4), शेवगाव 526.6 (146.3), पाथर्डी 544.5 (222.5), नेवासा 487.3 (124.9), राहुरी 510 (146.9), संगमनेर 402.4 (146.2), अकोले 553.9 (141.3), कोपरगाव 460.6 (63.7), श्रीरामपूर 547.1 (88.7), राहाता 499.2 (122.4) असा आहे.