पुणे (प्रतिनिधि)
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणीवरून शहरात सध्या राजकीय आणि सामाजिक वाद चांगलाच चिघळला आहे. या नामांतराच्या मागणीला विरोध म्हणून शहरात झळकलेल्या आक्षेपार्ह बॅनरबाजीवर बोलताना खासदार मेधा कुलकर्णी भावूक झाल्या, टीका करताना अमर्याद भाषेचा वापर केल्याने त्यांना अक्षरशः रडू कोसळले.
पुणे रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे शहरात ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले आहे. मेधा कुलकर्णीच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून, विविध संघटनांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे रेल्वे स्थानकाला ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
या वादामध्ये, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे शहरातील बुधवार पेठेत आणि बालगंधर्व चौकातही ‘बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा!’ अशा आशयाचे खोचक बॅनर झळकले होते. या बॅनरवर “कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!” असा मजकूर होता.
या बॅनरवरील मजकुराबद्दल मेधा कुलकर्णीनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “पुणे स्टेशनला सध्या नावच नाही. त्यामुळे, आता आपण सगळे नाव देऊ शकतो. बाजीराव पेशवे भूषणावह नाव आहे, ते नाव द्यावे, असे मत मी मांडले. कोणीही आपलं मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण, मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता?” असे म्हणताना त्या भावूक झाल्या.
टीका करताना काहीतरी पातळी आणि मर्यादा पाळली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, नामांतराचा निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत, त्यांनी केवळ अर्ज केला आहे. आपल्यावर टीका होऊ शकते, पण त्याला एक ‘लेव्हल’ ठेवावी असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, “मी जगभरात साडी नेसून गेले, माझे पोस्टर लावले मला खूप वाईट वाटले, अश्लील पोस्टर लावले. काळ सोकावू नये म्हणून अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. टीकेला मर्यादा तर ठेवा, महिला वर्ग म्हणून मी बोलले पाहिजे,” असे म्हणताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले, महिलांविषयी बोलताना दिल्या जाणाऱ्या उपमांबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.




