Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमAhilyanagar : राहुरीच्या व्यापार्‍याचे खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी जेरबंद

Ahilyanagar : राहुरीच्या व्यापार्‍याचे खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी जेरबंद

नेवासा, राहुरी तालुक्यातील तरूणांचा सहभाग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घरातून बाहेर पडलेल्या तांभेरे (ता. राहुरी) येथील व्यापार्‍याचे अपहरण करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करणारी टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे पकडली. या कारवाईत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोन संशयित पसार झाले आहेत.

- Advertisement -

ओम अशोक ठोंबरे (वय 20, रा. सुतारदरा, कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. देवगाव, ता. नेवासा), अजय शंकर हुलावळे (वय 21, रा. सुतारदरा, कोथरूड), सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे (वय 19, रा. तांभेरे), साई परमेश्वर ढवळे (वय 18, रा. भेंडा, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यातील आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. रामेश्वर उर्फ राया मारूती ढिंगे (रा. कोथरूड, पुणे) व रोहित रूईकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भेंडा, ता. नेवासा) अशी त्या दोघांची नावे असून ते पसार आहेत.

YouTube video player

व्यापारी बापुसाहेब रामदास गागरे (वय 39, रा. तांभेरे) हे 13 ऑक्टोबर 2025 रोजी वाकडी (ता. राहाता) येथे ड्रायव्हरला घेणेकामी जात असताना कारमधून संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. निळवंडे कॅनालच्या जवळ त्यांनी बापुसाहेब यांना हत्याराचा धाक दाखवून कारमध्ये जबरदस्ती बसवले व एका निर्जन गोडाऊनमध्ये नेले. तेथे मारहाण करून 10 लाखांची खंडणी मागितली. बापुसाहेब यांनी पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर संशयित आरोपींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून शनिशिंगणापूर फाट्याजवळ सोडले. त्यानंतरही संशयित आरोपी सतत फोन करून पैसे दिले नाहीत तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देत होते. याबाबत बापुसाहेब गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, सोनाली भागवत, अरूण मोरे यांचे पथक या तपासकामी काम करत होते. तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित ओम ठोंबरे व अजय हुलावळे पुण्यात कोथरूड भागात असल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने तात्काळ पुण्यात छापा टाकून त्या दोघांसह चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या अन्य दोन साथीदारांचीदेखील नावे समोर आली. या टोळींकडून एक लाख 19 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या चार संशयित आरोपींना पुढील चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास चालू आहे.

तांभेरेच्या गागरे यानेच रचला प्लॅन
फिर्यादी बापुसाहेब गागरे हे धान्याचे व्यापारी असून ते तांभेरे येथील रहिवाशी आहेत. तर संशयित आरोपी सोन्या ऊर्फ आदित्य गागरे हा देखील तांभेरे येथील असून त्याचे बापुसाहेब यांच्या सोबत संबंध होते. त्यांच्याविषयी आदित्यला माहिती होती. त्याने बापुसाहेब गागरे यांचे अपहरण करून खंडणी उकळण्यासाठी त्याच्या पुणे येथील संशयितांच्या मदतीने प्लॅन रचला. त्यानंतर बापुसाहेब गागरे यांचे अपहरण करण्यात आले. बापुसाहेब यांच्या हालचालींची माहिती आदित्यने इतर साथीदारांना दिली असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...