नाशिक | Nashik
येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सुरु झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी (MHCA vs BCA) ट्रॉफीत पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राच्या ७ बाद २५८ धावा झाल्या आहेत. यात यष्टीरक्षक सौरभ नवले ६० धावांवर नाबाद आहे. तर बडोदाकडून पहिल्या दिवशी अतित सेठने ३ बळी घेतले आहेत.
२३ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत हा चार दिवसीय रणजी सामना (Ranji Match) खेळविण्यात येत आहे. आज सामन्याचा पहिला दिवस होता. यावेळी बडोद्याने टॉस जिंकून महाराष्ट्राच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या महाराष्ट्राची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १२ व्या षटकातच सलामीची जोडी तंबूत परतली. यात पवन शाह १२ व मुर्तुझा ट्रंकवाला २२ धावा करून माघारी परतले. त्यानंतर १९ व्या षटकातच कर्णधार ऋतुराज गायकवाडला १० धावांवर बाद करून बडोद्याने महाराष्ट्र संघाला मोठा धक्का दिला.
यानंतर मात्र सिद्धेश वीर व यश क्षीरसागर यांनी ६८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. सिद्धेश वीर ४८ धावांवर तर पाठोपाठ यश क्षीरसागर ३० वर बाद झाला.त्यानंतर ६ बाद १४५ पासून यष्टीरक्षक सौरभ नवले व रामकृष्ण घोष यांची देखील ६८ धावांचीच भागीदारी झाल्यावर डावातील पहिला षटकार मारून रामकृष्ण कर्णधार कृणाल पंड्याच्या बॉलिंगवर दुसरा उंच फटका मारण्याच्या नादात २६ धावांवर बाद झाला. यावेळी महाराष्ट्राची धावसंख्या (Scored) ७ बाद २१३ इतकी होती.
दरम्यान, ७ व्या क्रमांकावरील यष्टीरक्षक सौरभ नवलेच्या दमदार अर्धशतकामुळे महाराष्ट्र संघाच्या पहिल्या दिवसअखेर ७ बाद २५८ धावा झाल्या आहेत. नवले ८ चौकारांसह ६० धावांवर नाबाद असून त्याला रजनीश गुरबानी संथ देत आहे. तसेच गुरबानी २२ धावांवर नाबाद आहे. तर बडोद्याकडून अतित सेठने ३, राज लिम्बाणीने २ आणि कृणाल पंड्या व महेश पिठीयाने प्रत्येकी १ बळी घेतला आहे.