अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी (27 एप्रिल) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात चेतन प्रफुल्ल पारख (वय 31, रा. आनंद बंगला, सावेडी नाका, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश निमसे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. खारेकर्जुने, ता. अहिल्यानगर) व गोपाल विधाते (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पारख यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (25 एप्रिल) रात्री 8:40 वाजता कंपनीत काम करणारे योगेश निमसे व गोपाल विधाते यांनी स्क्रॅपचे तुकडे वेल्डिंग शॉपमध्ये न नेता कंपनीच्या परवानगीशिवाय व कोणतीही अधिकृत माहिती न देता आर्थिक फायद्यासाठी परस्पर गायब केल्याची घटना घडली. याबाबतची माहिती पारख यांना मिळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली व फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.