अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी परिसरात दहशत करणार्या संतोष धोत्रे टोळीविरोधात अखेर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजूरी दिली आहे. यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ‘मोक्का’चे कलम वाढविण्यात आले आहे.
उसणे पैसे न दिल्याच्या कारणावरून संतोष धोत्रे व त्याच्या टोळीने निंबळक येथील व्यावसायिकावर खूनी हल्ला केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या तपासात संशयित आरोपींचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला. त्यांच्यावर पूर्वीपासूनच खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, महिलांवर अत्याचार, शस्त्र बाळगणे, जबरी चोरी यांसारखे तब्बल 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरूध्द ‘मोक्का’ कलमान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी ‘मोक्का’ अंतर्गत वाढीव कलम लावण्यास मंजूर दिली आहे.
टोळी प्रमुख संतोष रघुनाथ धोत्रे (वय 27 रा. चैतन्य हॉटेल पाठीमागे, गुंदेचा हाऊस, नागापुर), टोळी सदस्य मट्टस ऊर्फ अजय सोमनाथ गुळवे (वय 26, रा. लामखेडे पेट्रोल पंपाशेजारी, वैष्णवी हॉटेल, एमआयडीसी), अमोल गोरख आव्हाड (वय 23 रा. आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रस्ता, बोल्हेगाव, एमआयडीसी), अभि उर्फ अभिषेक नितीन गायकवाड (वय 20 रा. नागापुर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय 23, रा. गणेश चौक, बोल्हेगाव), सुधीर प्रदीप दळवी (वय 24, रा. दावल मलीक चौक, नागापुर), आबा ऊर्फ राहुल नाथा गोरे (वय 35, रा. चक्रधर स्वामी मंदीराजवळ, नागापुर), शरद जगन पाटोळे (वय 22 रा. चक्रधर स्वामी मंदीरा मागे, नागापुर), तुषार लहानु पानसरे (वय 19, रा. वडगाव रस्ता, साईराज नगर, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर), अक्षय बाळासाहेब ठुबे (वय 21, रा. सन फार्मा शाळेजवळ, आंबेडकर चौक, एमआयडीसी), यश सुनील सरोदे ऊर्फ प्रेम (वय 18, रा. चक्रधर स्वामी मंदीराजवळ, नागापुर), सुरज अरविंद भिगांरदिवे उर्फ खंडु (वय 21, रा. सेन्ट मेरी चर्च समोर, नागापुर), करण गौतम आवताडे (वय 21, रा. आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रस्ता, बोल्हेगाव), आशिष ऊर्फ पप्पु अंतोन पाटोळे (वय 21, रा. आंबेडकर चौक, नागापुर), यश भगवान बुट्टे (वय 21, रा. आंबेडकर चौक, नागापूर), शेख मोहम्मद ताहीर मुन्ना (वय 21, रा. कसबे वस्ती, सावेडी), जॅकी ऊर्फ धिरज आवारे, अदित्य लक्ष्मण जाचक व प्रतिक नवनाथ तागड यांच्याविरूध्द ‘मोक्का’ कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून या टोळीच्या इतर सदस्यांवर लक्ष ठेऊन अधिक तपास सुरू आहे. अशा प्रकारची कठोर पावले उचलूनच एमआयडीसी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक टिकवता येईल, असा विश्वास पोलीस दलाने व्यक्त केला आहे.
व्यावसायिकावर केला होता हल्ला
उसणे पैसे न दिल्याच्या कारणावरून निंबळक (ता. अहिल्यानगर) येथील गणेश किराणा स्टोअर्सवर 2 मार्च 2025 रोजी संतोष धोत्रे आणि त्याच्या 18 साथीदारांनी मिळून हल्ला केला होता. तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी हल्ला केल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यात व्यावसायिक राजेंद्र पोपट कोतकर यांच्यासह साक्षीदार जखमी झाले होते. कोतकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




