अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जेऊर बायजाबाई (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका कत्तलखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (22 नोव्हेंबर) सकाळी धाड टाकत कारवाई केली. पोलिसांनी 200 किलो गोमांसासह कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मुनीर खैरू शेख (रा. जेऊर बायजाबाई), मोहसीन मुश्ताक शेख (रा. भिंगार, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
जेऊर बायजाबाई गावातील मुनीर खैरू शेख हा गोवंशीय जनावराचे मांस विक्री करीत आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार सुशांत दिवटे, आजिनाथ पालवे, ज्ञानेश्वर तांदळे, शुभम सुद्रुक, सरुज देशमुख यांचे पथक तयार करून सकाळी 7 वाजता घटनास्थळी दाखल झाले. छापेमारीदरम्यान घरात मोहसीन मुश्ताक शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला.
तेथे कत्तलीसाठी लागणारे साहित्य व अंदाजे 200 किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जप्त केलेला मुद्देमाल हा मुनीर खैरू शेख याचा असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




